Whats new

महाराष्ट्राच्या महिलांची रिलेत हॅटट्रिक; राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रिचा शर्मा, वीरधवलचा धडाका

  swimming

महाराष्ट्राच्या महिलांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने 66व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले. नुकत्याच झालेल्या 4 बाय 100 मीटर फ्री-स्टाइल शर्यतीत त्यांनी नव्या विक्रमासह सलग तिसरे सुवर्णपदक मिळवले. पोलिसची रिचा शर्मा आणि महाराष्ट्राचा वीरधवल खाडे यांनी आजही आपला धडाका कायम राखत अनुक्रमे पाचवे आणि चौथे सुवर्णपदक मिळवले. दरम्यान, पदक तालिकेत महाराष्ट्राने सुवर्णपदकाच्या जोरावर आपली आघाडी कायम राखली. महाराष्ट्राची (11+5+10) एकूण 26 पदके असून, कर्नाटक एका सुवर्णपदकाने अजूनही सर्वाधिक (10+11+7) 28 पदके मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या तरण तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी कर्नाटकला जबरदस्त टक्कर देत तीन वर्षांपूर्वी त्यांनी नोंदवलेला 4: 08.63 सेकंदाचा विक्रम मोडून काढत सुवर्णपदक पटकावले. आरती घोरपडे, आकांक्षा व्होरा, आदिती घुमटकर आणि ज्योत्स्ना पानसरे या महाराष्ट्राच्या चमूने 4 : 07.09 सेकंद अशी वेळ दिली. पुरुषांमध्ये मात्र कर्नाटकने वर्चस्व कायम राखले. त्यांनी आपलाच विक्रम मोडून काढला. महाराष्ट्राला ब्रांझपदकावर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्राच्या वीरधवलने चौथे सुवर्णपदक पटकावताना 50 मीटर फ्री-स्टाइल शर्यत 22.84 सेकंदात जिंकताना जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी ‘ब’ पात्रता निकष पूर्ण केला. रिचाने 1500 मीटर फ्री-स्टाइल शर्यत आरामात 17ः46.76 सेकंद वेळ देत जिंकली. मात्र, तिचा राष्ट्रीय विक्रम केवळ शतांश 38 सेकंदांनी हुकला. दरम्यान, वॉटरपोलोत पुरुषांमध्ये सेनादल आणि रेल्वे अंतिम झुंज होईल. सेनादलाने पोलिस संघाचा 12-7, तर रेल्वेने महाराष्ट्राचा 8-1 असा पराभव केला. महिलांमध्ये केरळ आणि बंगाल यांच्यात अंतिम लढत होईल. केरळने महाराष्ट्रावर 7-5, बंगालने पोलिस संघावर 2-0 असा विजय मिळवला.

निकाल -
पुरुष : 200 मीटर वैयक्तिक मिडले (2: 07.38 सेकंद) - ऍरॉन डिसूझा (कर्नाटक), संदीप शेजवल (रेल्वे), एम. अरविंद (कर्नाटक), 100 मीटर बॅकस्ट्रोक (58.97 सेकंद) - एम. बी. बालकृष्णन (तमिळनाडू), रोहित हवालदार (कर्नाटक), रोहित इमोलिया (मध्य प्रदेश), 50 मीटर फ्री-स्टाइल (22.84 सेकंद) - वीरधवल खाडे (महाराष्ट्र), अंशुल कोठारी (गुजरात), जे. पी. अर्जुन (रेल्वे), 4 बाय 100 मीटर फ्री-स्टाइल रिले (3 : 32.14 सेकंद) कर्नाटक, रेल्वे, महाराष्ट्र.

महिला - 1500 मीटर फ्री-स्टाइल (17 : 46.76 सेकंद) - रिचा शर्मा (पोलिस), सुरभी टिपरे (कर्नाटक), आकांक्षा व्होरा (महाराष्ट्र), 200 मीटर वैयक्तिक मिडले (2 : 28.20 सेकंद) - पूजा अल्वा (कर्नाटक), ए. व्ही. जयवीणा, व्ही. के. आर. मीनाक्षी (दोघी तमिळनाडू), 100 मीटर बॅकस्ट्रोक (1 : 07.69 सेकंद) - ज्योत्स्ना पानसरे, आरती घोरपडे (दोघी महाराष्ट्र), सोनी सिरीक (केरळ), 50 मीटर फ्री-स्टाइल (27.76 सेकंद) - तलशा प्रभू (गोवा), शिवानी कटारिया (हरियाना), आदिती घुमटकर (महाराष्ट्र), 4 बाय 100 मीटर फ्री-स्टाइल रिले (4 : 07.09 सेकंद) - महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू.

Next >>