Whats new

निर्मलग्राम पुरस्कार योजना अखेर बंद

 nirmal gram

ग्रामीण भागातील उघड्यावरील शौचविधीचा प्रकार बंद करून ग्रामीण परिसर स्वच्छ व सुंदर व्हावा, यासाठी केंद्र सरकारने 2003 मध्ये निर्मलग्राम पुरस्कार योजना जाहीर केली होती. या योजनेत निर्मल झालेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात येत होते. आता निर्मलग्राम पुरस्कार योजना केंद्राकडून खंडित करण्यात आल्याने निर्मलग्रामसाठी काम करणा-या ग्रामपंचायतींना फटका बसणार आहे.

यापुढील निर्मलग्राम पुरस्कार योजनेची राज्यस्तरावरून राबवण्यात येणारी प्रक्रियादेखील बंद करण्यात आली आहे. मात्र 2012-13 मध्ये जाहीर झालेल्या निर्मलग्राम पुरस्काराची सरकारी पातळीवरून राबवण्यात येणारी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरस्कार योजना बंद केल्याने ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्यातील निकोप स्पर्धा कमी होऊन गावे निर्मल होण्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

निर्मलग्राम पुरस्कार 2012-13 अंतर्गत महाराष्ट्रातील 355 ग्रामपंचायतींना केंद्र सरकारने रोख पुरस्कार जाहीर केलेले आहेत. यामध्ये केंद्राचा 80 टक्के तर राज्याचा 20 टक्के वाटा आहे. या वर्षात केंद्राचे 9 कोटी 10 लाख 80 हजार व राज्याच्या हिश्श्याचे 2 कोटी 27 लाख अनुदान संबंधित जिल्हा परिषदेला मिळेल. 2012-13 मधील निर्मलग्राम पुरस्कार हे अंतिम राहणार आहेत.

Next >>