Whats new

ज्येष्ठ कलावंत विजू खोटे यांना जनकवी पी. सावळाराम पुरस्कार जाहीर

 viju khote

आपल्या अभिनयाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांना या वर्षीचा जनकवी पी सावळाराम, तर आपल्या अभिनयाने सिने-नाट्य क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या वतीने संगीत, चित्रपट, साहित्य, नाट्य, कला व शिक्षण क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी करणा-या गुणिजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी पुरस्काराचे हे सोळावे वर्ष आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त हे उपस्थित राहणार आहेत. चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे विजू खोटे यांना या वर्षीच्या जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25 हजार रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खोटे यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोले चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.

ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना या वर्षीचा गंगा-जमुना पुरस्कार जाहीर झाला आहे. 21 हजार रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गांधी यांनी 125 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. "केला इशारा जाता जाता‘, "वैभव‘, "वैजयंता‘, "सांगते ऐका‘, "सुशीला‘ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

इतर पुरस्कारांमध्ये साहित्यिक अरुण मळेकर, शैक्षणिक कार्यासाठी सावित्री कुळकर्णी यांना आणि उदयोन्मुख कलाकार म्हणून विनय राजवाडे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. 11 हजार रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Next >>