Whats new

इस्रो सिंगापूरचे सहा उपग्रह सोडणार

 isro

भारताची अव्वल अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोतर्फे सिंगापूरचे सहा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले जाणार आहेत. पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने या उपग्रहांचे एकाचवेळी प्रक्षेपण केले जाणार आहे. या उपग्रहांचे वजन 625 किलो असून हाही एक विक्रम असल्याचे इस्रोच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

इस्रोच्या वाणिज्य विभाग अंतरिक्ष कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व्ही. एस. हेगडे यांच्या म्हणण्यानुसार हे प्रक्षेपण पूर्णतः व्यावसायिक स्वरूपाचे आहे. श्रीहरिकोट्टा येथील अवकाश यान प्रक्षेपण केंद्रातून 16 रोजी या सहा यानांचे प्रक्षेपण होणार आहे. पीएसएलव्ही हे भारतीय बनावटीचे अवकाश प्रक्षेपक रॉकेट सकाळी 6 वाजता अवकाशाच्या दिशेने झेपावेल, असे या अधिका-याने सांगितले.

पृथ्वी परीक्षणाच्या उद्देशाने हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. टेलोज या नावाने हे उपग्रह ओळखले जातात. यांचे वजन सुमारे 400 किलो आहे. त्यासह एकूण 625 किलो वजन या रॉकेट लाँचरबरोबर असेल. यातील एक उपग्रह हा सिंगापूर टेक्नॉलॉजिस अँड इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा आहे. तर अन्य पाच उपग्रह सिंगापूर विद्यापीठाचे आहेत. सिंगापूरमधील वातावरण ढगाळ असल्याने ते भारतातून सोडले जाणार आहेत. पृथ्वीपासून 550 किलोमीटरवरील कक्षेत ते स्थापित केले जाणार असून त्यांच्याद्वारे पृथ्वी परीक्षण केले जाणार आहे.

इस्रोने 2015 या कॅलेंडर वर्षामध्ये आजअखेर 14 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. यामध्ये 3 भारतीय तर 11 परदेशी उपग्रह आहेत. यातील 13 उपग्रहांचे प्रक्षेपण हे भारताचे सर्वाधिक लोकप्रिय प्रक्षेपक पीएसएलव्हीच्याच माध्यमातून श्रीहरीकोट्टा येथून करण्यात आले आहे. आता या सहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यास ही संख्या 20वर जाणार असल्याचेही सांगण्यात आले. गेल्याच महिन्यात भारताचा दळणवळण उपग्रह जीसॅट 15 हा एरियन रॉकेटच्या मदतीने पाठवण्यात आला होता.

Next >>