Whats new

सम्यक साहित्य संमेलन अध्यक्षपदी रावसाहेब कसबे, तर डॉ. आ. ह. साळुंखे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

 salunkhe

यंदाच्या पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांची निवड झाली आहे. असहिष्णुता हा या संमेलनाचा मुख्य विषय असून, संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. आ. ह. साळुंखे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

महात्मा फुले यांचे रौप्य स्मृती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे हे चारदिवसीय (17 ते 20 डिसेंबर) संमेलन होणार आहे. त्याचे उद्घाटन दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 18) बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

संमेलन परिसरास संविधान नगरी असे संबोधण्यात येणार असून, येथील मुख्य प्रवेशद्वारास डॉ. दाभोलकर, तर अन्य प्रवेशद्वारांस कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, कॉ. शरद पाटील, ऍड. एकनाथ आव्हाड अशी नावे देण्यात आली आहेत. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, बार्टी‘चे महासंचालक डॉ. डी. आर. परिहार, उर्दू लेखक झकीर अली, साहित्यिक नीरजा उपस्थित राहतील. रंगनाथ पठारे, सुरेंद्र जोंधळे, हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, उत्तम कांबळे आदी साहित्यिकांच्या अध्यक्षतेखाली पाच परिसंवाद होणार आहेत. तर प्रज्ञा पवार आणि मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दोन कविसंमेलने, "तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य‘ या नाटकावर अतुल पेठे यांचे अभिवाचन आदी कार्यक्रम होतील.

Next >>