Whats new

2015-16 मध्ये भारताचा विकासदर राहणार 7.3 टक्के

 UNO

2015-16 या आर्थिक वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्के विकासदर गाठणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जरी मंदी असली तरी 2016 आणि 2017 या दोन्ही वर्षामध्ये जगातील सर्वात जास्त वेगाने वाढ होणारी अर्थव्यवस्था राहणार आहे. 2016-17 या वर्षामध्ये 7.5 टक्के विकासदर गाठणार आहे. भारताचा व्यापार आणि देशामध्ये होणारी गुंतवणुकीमध्ये वाढ होणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये म्हणण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि समृद्धी 2016 या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भारताची प्रतिस्पर्धी असणारी दक्षिण आशियातील चीनची अर्थव्यवस्था 2016 मध्ये 6.4 टक्के विकासदर गाठणार आहे. 2015 मध्ये चीनने 6.8 टक्के विकासदर गाठला होता. गेल्या काही वर्षामध्ये चीनच्या विकासदराला उतरती कळा लागली आहे. 2017 मध्ये सुद्धा चीनचा विकासदर 6.5 टक्के राहणार आहे. चीनसह ब्राझील आणि रशियाच्याही अर्थव्यवस्थेमध्ये समाधानकारक बदल होणार नाहीत. चीनबरोबर अमेरिकेच्याही अर्थव्यवस्थेमध्ये समाधानकारक बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 2014-2015 या वर्षात 2.4 टक्के विकासदर असणारी अमेरिकेची अर्थव्यवस्था 2015-2016 मध्ये 2.6 टक्के विकासदर गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 2016-2017 मध्ये 2.8 टक्के विकासदर गाठेल असे म्हणण्यात आले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेने 2015 मध्ये समाधानकारक प्रगती केली नसली तरी 2016 आणि 17 या दोन वर्षामध्ये काहीशी समाधानकारक राहिल. जागतिक विकासदर 2015 मध्ये केवळ 2.4 टक्के होता. हा दर संयुक्त राष्ट्राने सहा महिन्यापूर्वी जारी केलेल्या दरापेक्षा 0.4 टक्के कमी होता. जागतिक अर्थव्यवस्थेने आर्थिक बंधने उठवल्यास आणि नाणेनिधी संघटनेकडून योग्य भूमिका घेतल्यास 2016 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 2.9 तर 2017 मध्ये 3.2 टक्के दराने वाढ होणार आहे, असे भाकित वर्तवण्यात आले आहे.

Next >>