Whats new

विकास गौडा ऑलिम्पिकसाठी पात्र

 vikash gawda

भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा पुढील वर्षीच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स प्रकारात खेळाडूंची संख्या वाढविण्यासाठी पात्रता निकष शिथिल केल्यामुळे गौडाला पात्रता गाठता आली.रिओ ऑलिम्पिकसाठी एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्रता निकषांतर्गत पुरुषांच्या थाळीफेकसाठी ६६ मीटर हे निकष ठरविण्यात आले होते. अलीकडे आयएएएफने हे अंतर कमी करून ६५ मीटरपर्यंत आणले. गौडाने मे महिन्यात जमैका आमंत्रित अॅथलेटिक्समध्ये ६५ मीटर थाळीफेक केली होती. सध्याचा आशियाई विजेता ३२ वर्षांचा गौडाने ९ मे रोजी किंग्स्टन येथे ६५.१४ मीटर थाळीफेक करीत आयएएएफची मंजुरी असलेली स्पर्धा जिंकल्याने तो रिओसाठी पत्र ठरला आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे महासचिव के. सी. वाल्सन यांनी गौडा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याच्या दुजोरा दिला.

वाल्सन म्हणाले, ‘‘जमैकाची स्पर्धा आयएएएफची मान्यताप्राप्त स्पर्धा होती, शिवाय या स्पर्धेचे आयोजन पात्रता निकष बदलल्यानंतर झाले. गौडा आता रिओ ऑलिम्पिकमध्ये थाळीफेक करण्यास सज्ज आहे. तो ६५ मीटरपेक्षा अधिक थाळीफेक करू शकल्यास पदक जिंकण्याची शक्यता निर्माण होईल.’’

गौडासोबतच पायी चालण्याच्या शर्यतीतील खेळाडू सपना आणि पुरुष मॅरेथॉनपटू नितेंद्रसिंग रावत हेदेखील रिओसाठी पात्र ठरले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सपनाने १ तास ३५ मिनिटे ३६ सेकंद वेळ नोंदवित रिओसाठी पात्रता गाठली होती. याशिवाय जपानच्या नोमी सिटीत झालेल्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत सपना चौथ्या स्थानावर आली. ऑलिम्पिक पात्रता निकष १ तास ३५ मिनिटे असे आहेत. रावतने गेल्या महिन्यात दिल्ली अर्धमॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांच्या गटात विजेतेपदाचा मान मिळविला. कोरियात त्याने ११ ऑक्टोबर रोजी विश्व सैनिकी क्रीडा स्पर्धेत २ तास १८ मिनिटे ६ सेकंद वेळ नोंदविली होती. यंदा पात्रता निकष २ तास १७ मिनिटे बदलून २ तास १९ मिनिटे असा करण्यात आला.

Next >>