Whats new

सेरेना विल्यम्सला वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार

 SARENA VILLIAMS

या वर्षात 56 पैकी तब्बल 53 सामने जिंकणा-या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला एका शानदार सोहळय़ात वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड’ या मासिकाच्या वतीने सदर प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातो. 34 वर्षीय सेरेनाने या पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या एनबीए स्टार स्टीफन करी, गोल्फर जॉर्डन स्पिथ, रेसहॉर्स अमेरिकन फॅरोह यांना पिछाडीवर टाकले.यंदा 2015 वर्षात चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचाही पराक्रम साकारला असून वर्षातील चारही ग्रँडस्लॅम जिंकत ‘सेरेना स्लॅम’ पूर्ण करण्याची तिच्यासाठी ही कारकिर्दीतील दुसरी वेळ ठरली.सेरेनाने यंदा 53 विजय व 3 पराभव अशी देदीप्यमान, लक्षवेधी कामगिरी नोंदवली. शिवाय, प्रत्येक आठवडय़ाला जाहीर होणाऱया मानांकन यादीतही सातत्याने अव्वलस्थान कायम राखले. यंदा तिने आपल्या ग्रँडस्लॅम जेतेपदांची संख्या 21 वर नेली. शिवाय, स्टेफी ग्राफच्या विक्रमानजीक मोठी झेप घेतली.

‘मागील 20 वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत मी उत्तमोत्तम कामगिरीचा ध्यास बाळगला आणि तो प्रत्यक्षात साकारण्यासाठी हरसंभव प्रयत्नही केले. आजवरची वाटचाल पाहता त्यात मला बरेच यश संपादन करता आल्याचे दिसून आले. अर्थात, यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. मोठे त्याग करावे लागले आहेत. आता या पुरस्काराने सन्मानित झाले, तो माझ्या कारकिर्दीचा आणखी एक गौरव होय’, असे सेरेनाने पुरस्कार संपादन केल्यानंतर नमूद केले.

‘जागतिक स्तरावर आणखी बरेच ग्रँडस्लॅम जिंकणे हे माझे स्वप्न आहे’, असे सेरेनाने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ‘मी ग्रँडस्लॅमचे यश कधीही सांख्यिकदृष्टय़ा मोजले नाही. पण, यश संपादन करत असताना अनेक विक्रम माझ्या खात्यावर जमा होत राहिले. या कालावधीत माझी टेनिसमधील उंची ऑस्ट्रेलियाची मार्गारेट कोर्ट, स्टेफी ग्राफ यांच्या आसपास पोहोचू शकली, शिवाय, जिम्नॅस्ट मेरी ल्यू रेटन व स्पीड स्केटर बोनी ब्लेयर यांच्यानंतर मला वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार लाभला, याचा खास आनंद वाटतो’, असे सेरेना म्हणाली.

टेनिस जगतात मार्गारेट कोर्टच्या खात्यावर सर्वाधिक 24 तर स्टेफी ग्राफच्या खात्यावर 22 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. त्या पार्श्वभूमीवर सेरेनासमोर आता या उभय दिग्गजांना मागे टाकण्याचे लक्ष्य असू शकते. स्वतः सेरेना मात्र याचा साफ इन्कार करते. ‘माझ्या दृष्टीने 21, 22, 24 हे सर्व निव्वळ आकडे आहेत. व्यक्तिशः मी एकावेळी केवळ एकाच स्पर्धेवर लक्ष केंद्रित करते आणि याच धर्तीवर मी आजवर यश संपादन केले आहे’, असे ती म्हणते.

Next >>