Whats new

अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी, तर बहुलकर यांना भाषा सन्मान जाहीर

 khopkar

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीचे अभ्यासक अरुण खोपकर यांना ‘चलत चित्रव्यूह’ या स्मृतिग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणी भाषेत उदय भेंब्रे यांच्या ‘कर्ण पर्व’ या नाटकाची निवड झाली आहे. अरुण साधू, प्रा. दिगंबर पाध्ये आणि ना.धों. महानोर यांच्या निवड मंडळाने खोपकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली. ताम्रपट, शाल व १ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुण्याच्या ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’चे विद्यार्थी असलेले खोपकर दिग्दर्शक, अभिनेता, निर्माते, अध्यापक आणि अभ्यासक अशा विविधांगी भूमिकांतून गेली चार दशके चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. विविध कलाप्रकारांचा वेध घेणा-या त्यांच्या चित्रपटांना सर्वोत्तम चित्रपट - दिग्दर्शकासाठीच्या तीन ‘गोल्डन लोट्स’ पुरस्कारांसह १५हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावर खोपकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाला चित्रपटविषयक सर्वोत्तम पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. ‘स्मृतिग्रंथ’ या वर्गात साहित्य अकादमीने पुरस्कारासाठी निवड केलेला ‘चलत चित्रव्यूह’ हा अरुण खोपकर यांनी लिहिलेल्या एकूण १९ मराठी ललितनिबंधांचा संग्रह आहे. यापैकी काही निबंधांत खोपकर यांनी भूपेन खक्कर, जहांगीर सबावाला, चार्लस् कोरिया, मणी कौल, ऋत्विक घटक आणि भास्कर चंदावरकर यांच्यासह इतर काही महान कलावंतांची व्यक्तिचित्रे घनिष्ट सहवासातून उलगडली आहेत.

२३ साहित्यिकांची निवड
साहित्य अकादमीने पुरस्कारांसाठी इंग्रजीसह २३ भारतीय भाषांमधील साहित्यकृतींची निवड केली आहे. त्यात लघुकथा व कवितांसाठी प्रत्येकी सहा, कादंबरीसाठी चार, ललितनिबंध, समीक्षा आणि नाट्यलेखनासाठी प्रत्येकी दोन आणि स्मृतिग्रंथासाठी एका पुरस्काराचा समावेश आहे.

बहुलकर यांना भाषा सन्मान
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांना अभिजात व मध्ययुगीन साहित्यातील योगदानाबद्दल ‘भाषा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख, ताम्रपट व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Next >>