Whats new

दहावीत भंगारातून बनवले ‘रोड क्लीनर’, मिळाले पाच वर्षांनी पेटंट

 swach

सध्या पुणे येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या अकोल्याच्या अजिंक्यने इयत्ता दहावीमध्येच तयार केलेल्या 'रोड क्लीनर' यंत्राचं तब्बल पाच वर्षांनी पेटंट देण्यात आले आहे. अकोल्याचा मूळ रहिवासी अजिंक्य दीपक घुमन हा सध्या पुणे येथे पीव्हीपीआयटी व एस.पी.एम. महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. त्याने नुकतीच राष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळवण्यासाठी परीक्षा दिली असून, यामध्ये तो उत्तीर्ण झाला आहे. ही परीक्षा त्याने तयार केलेल्या 'रोड क्लीनर' या प्रोजेक्टसाठी दिली होती. या प्रोजेक्टचे पेटंट देण्यात आले असले, तरी त्यासाठी त्याला तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अजिंक्य इयत्ता सातवीमध्ये असताना त्याच्या डोक्यात रोड क्लीनरची संकल्पना आली. शालेय अभ्यासासोबतच त्याने रोड क्लीनर यंत्रासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जुळवाजुळव चक्क भंगारातून केली. उन्हाळ्य़ाच्या सुट्यांमध्ये त्याने प्रोजेक्टच्या प्रत्यक्ष कृतीला प्रारंभ करून तीन महिन्यांच्या कालावधीत 'रोड क्लीनर'ची छोटेखानी प्रतिकृती तयार केली. हसत-खेळत तयार झालेल्या या प्रतिकृतीला विविध स्तरांवरून बक्षिसे प्राप्त झाली. बक्षीस स्वरूपातून प्राप्त झालेल्या निधीतून त्याने प्रत्यक्षात उपयोगी पडणा-या 'रोड क्लीनर'च्या निर्मितीचा ध्यास घेतला. दरम्यान, त्याने फेब्रुवारी २0१५ मध्ये पेटंट मिळवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर परीक्षा दिली होती. नोव्हेंबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात अजिंक्यला यश मिळाले.

'रोड क्लीनर' असं करतं काम
रस्त्यावरील कचरा उचलणे, रस्ता पाण्याने पुसणे, रस्त्यावरील गवत, लहान झडपं कापणे आदी कामे हे रोड क्लीनर नामक यंत्र करते. साधारणत: एक किलोमीटरकरिता १0 ते १५ मिनिटे अशा वेगाने हे रोड क्लीनर काम करते.

इतर प्रोजेक्टच्या पेटंटसाठी तयारी
अजिंक्य घुमनचे रोड क्लीनरसोबतच रोड पॅचर आणि साइड ग्लास क्लीनर या प्रोजेक्टवरही काम सुरू आहे. या प्रोजेक्टचे पेटंट मिळवण्यासाठी अजिंक्य परीक्षेच्या तयारीला लागला आहे.

Next >>