Whats new

युद्धग्रस्त सीरियासंदर्भातील शांतता प्रस्ताव मंजूर- संयुक्त राष्ट्रसंघ

 UNO-Syria

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीने सीरियामधील शांतता प्रक्रियेसंदर्भातील मसुदा एकमताने मंजूर केला आहे. सीरियामधील रक्तरंजित युद्धामध्ये आत्तापर्यंत अडीच लाखपेक्षा जास्त नागरिक प्राणास मुकले असून लक्षावधी विस्थापित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संमत करण्यात आलेला शांतता प्रक्रियेसंदर्भातील हा मसुदा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

"सीरियामधील हिंसाचार थांबवून येथे पुन्हा एकदा जनसमर्थन असलेल्या सरकारची पायाभरणी करणे अत्यावश्यक असल्याचा संदेश या मसुद्यामधून स्पष्टपणे देण्यात आला आहे,’’ असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे. सीरियामधील बाशर अल असद यांची राजवट आणि येथील भूराजकीय परिस्थितीसंदर्भात अमेरिका व रशियामधील मतभेद अनेकदा प्रखरपणे व्यक्त झाले आहेत. असद यांना रशियाचा ठाम पाठिंबा आहे; तर असद यांनी पायउतार व्हावे, अशी अमेरिकेची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर संमत करण्यात आलेल्या या मसुद्यामध्ये असद यांच्या भविष्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.केरी यांनी असद यांच्यासंदर्भात अद्यापी तीव्र मतभेद असून या मसुद्यामुळे सर्व अडथळे नष्ट झाल्याचा समजूत करुन घेण्यात कोणताही अर्थ नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांनीही या पार्श्वभूमीवर सीरियावर बाहेरुन लादल्या जाणाऱ्या निर्णयांना हा मसुदा हे योग्य उत्तर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या मसुद्यानुसार, शांततेचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर एक महिन्याच्या शस्त्रसंधी काळामध्ये प्रत्यक्ष परिस्थितीचे सुरक्षा समितीकडून ‘निरीक्षण’ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याचबरोबर, याआधी व्हिएन्नामध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये संमत करण्यात आलेल्या वेळापत्रकासही या मसुद्यामध्ये पाठिंबा देण्यात आला आहे.

Next >>