Whats new

सिंगापूर स्लॅमर्सने पटकावले ‘आयपीटीएल’चे विजेतेपद

 singapore slammers

सिंगापूर स्लॅमर्स संघाने २०१५ इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगचे आयपीटीएल विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत स्टॅन वाववरिन्काच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर सिंगापूर स्लॅमर्सने गतविजेत्या इंडियन एसेसवर २६-२१ अशी मात केली. कार्लोस मोयाने स्लॅमर्सला जोरदार सुरुवात करून दिली. पुरुषांच्या लिजंड्स एकेरीत मोयाने इंडियन एसेसच्या फॅब्रिस सँटोरोला ६-४ असे ३२ मिनिटांत पराभूत केले आणि स्लॅमर्सच्या विजयाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ महिला एकेरीत बोलिंडा बेंसिचने इंडियन एसेसच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवावर ६-५ (७-३) अशी संघर्षपूर्ण मात केली आणि स्लॅमर्सला १२-९ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा - रोहन बोपण्णा यांनी स्लॅमर्सच्या कॅरोलिना प्लिस्कोवा-डस्टिन ब्राऊन यांच्यावर ६-२ अशी २१ मिनिटांत मात केली आणि एसेसला १५-१४ अशी निसटती आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्टॅन वावरिन्काने इंडियन एसेसच्या बर्नार्ड टामिचवर ६-३ अशी मात केली आणि स्लॅमर्सला २०-१८ अशी आघाडी मिळवून दिली. अर्थात, अखेरच्या पुरुष दुहेरीत कोण बाजी मारणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या निर्णायक लढतीत स्टॅन वावरिन्का-मार्सेलो मेलो यांनी इंडियन एसेसच्या रोहन बोपण्णा-इव्हान डाडिग यांच्यावर ६-३ अशी मात केली आणि सिंगापूर स्लॅमर्सच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील पुरुष गटात इंडियन एसेसच्या इव्हाना डाडिगला आणि महिला गटात स्लॅमर्सच्या बेलिंडाला ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ म्हणून गौरवण्यात आले.

Next >>