Whats new

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारताने १६ पदकांची लयलूट

 table tennis

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारताने १६ पदकांची (३ सुवर्ण, ६ रौप्य व ७ कांस्यसह १६ पदके) लयलूट करून विक्रमी कामगिरीची नोंद केली. भारताची या स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने गतवेळी नऊ पदकांची कमाई केली होती. पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या सौम्यजित घोष व हरमित देसाई विजेतेपदाचे मानकरी ठरले. त्यांनी अंतिम फेरीत आपलेच सहकारी जी. साथियन व देवेश कारिया यांच्यावर ५-११, ११-८, १०-१२, ११-९, ११-३ अशी मात केली.

सिंगापूरच्या चेन फेंगने राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतील एकेरीत सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न येथे साकार केले. महिलांमध्ये सिंगापूरच्या झोऊ यिहानने भारताच्या मौमा दासवर मात करीत एकेरीतील पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. तिने महिलांच्या सांघिक विजेतेपद व दुहेरीतील अजिंक्यपदासह तिहेरी मुकुट पटकाविला. दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत फेंगने अंतिम फेरीत भारताच्या अॅन्थोनी अंमलराजवर ११-५, ११-५, ९-११, ६-११, १४-१२, ११-७ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. फेंगचे एकेरीतील हे पहिलेच अजिंक्यपद आहे. महिलांच्या अंतिम लढतीत यिहानला मौमाविरुद्ध ११-७, ११-५, ७-११, ११-२, ११-३ असा विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही. यिहानचे या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे. तिने येथे सिंगापूरला सांघिक विभागात विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.महिलांच्या दुहेरीत यिहान व लिन येई यांनी विजेतेपद पटकावताना भारताच्या मनिका बात्रा व अंकिता दास यांना ११-६, ११-९, ११-९ असे हरवले.

भारताचे पदक विजेते *सांघिक- *मिश्र दुहेरी – सुवर्ण- अंकिता दास व जी.साथियन, रौप्य- मौमा दास व सौम्यदीप घोष, कांस्य- अॅन्थोनी अंमलराज व के.शामिनी. *पुरुष एकेरी- रौप्य- अॅन्थोनी अंमलराज, कांस्य- सौम्यजित घोष व सानिल शेट्टी. *पुरुष दुहेरी- सुवर्ण- सौम्यजित घोष व हरमित देसाई, रौप्य-जी.साथियन व देवेश कारिया. कांस्य- अॅन्थोनी अंमलराज व सानिल शेट्टी, सुधांश ग्रोव्हर व अभिषेक यादव. *महिला एकेरी-रौप्य-मौमा दास, कांस्य-मनिका बात्रा. *महिला दुहेरी- रौप्य- मनिका बात्रा व अंकिता दास, कांस्य- मौमा दास व के.शामिनी.

Next >>