Whats new

मनू-सुमित यांना मॅक्सिको ओपनचे शानदार विजेतेपद

 manu-sumit

मनू अत्री आणि बी सुमित रेड्डी या भारतीय जोडीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये वर्षाची अखेर विजयाने करताना मॅक्सिको ओपनचे शानदार विजेतेपद पटकावले. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने थायलंडच्या बोडिन इसारा आणि निपितफोन पी. यांना लोळवले.

स्पर्धेत तृतीय मानांकन लाभलेल्या मनू - सुमित यांनी लौकिकानुसार खेळ करताना अंतिम सामन्यात धडक मारली. याआधी त्यांनी यूएस ओपन आणि डच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे या जोडीवर भारताच्या विजेतेपदाच्या आशा होत्या. दरम्यान, दोन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मनू - सुमित यांना पहिल्या सेटमध्ये थायलंडच्या जोडीने झुंजवले. २०-१६ अशी भक्कम आघाडी मिळवलेली असताना भारतीयांना प्रतिस्पर्धी जोडीकडून कडव प्रतिकार मिळाला. या वेळी इसार - निपितफोन यांनी जबरदस्त पुनरागमन करताना सलग ४ गुण मिळवून बरोबरी साधली. मात्र, मोक्याच्यावेळी खेळ उंवताना भारतीयांनी २२-२० अशी बाजी मारून १-० अशी आघाडी घेतली. यानंतर पुन्हा एकदा मनू - सुमित यांनी सुरुवातीपासून आपले वर्चस्व राखताना दुसरा सेटही जिंकत इसारा - निपितफोन यांना २२-२०, २१-१८ असा धक्का दिला आणि स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद उंचावले.

Next >>