Whats new

आयएनएस गोदावरी निवृत्त

 INS-GODHAVARI

नौदलाच्या शिरपेचातील मानाचा तुरा मानली जाणारी आणि संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका ‘आयएनएस गोदावरी’ निवृत्त झाली. तब्बल ३२ वर्षे नौदलात चोख कामगिरी बजावणाऱ्या या युद्धनौकेच्या निवृत्तीने गौरवशाली इतिहासाची सांगता झाली.

मुंबईतील नौदलाच्या गोदीत मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने गोदावरीच्या निवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. जवानांनी नौकेवरील नौदलाचा पांढरा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवून तो गोदावरी युद्धनौकेचे कप्तान विशाल रावत यांच्याकडे सुपुर्द केला. कप्तान रावत यांनी ‘लास्ट पोस्ट’च्या सुरावटीवर पश्चिम मुख्यालयाचे चिफ स्टाफ ऑफीसर व्हाइस अ‍ॅडमिरल हरी कुमार यांना कडक सॅल्यूट ठोकत ‘आयएनएस गोदावरी डि-कमिशन्ड सर’ असे रिपोर्ट केले. टपाल खात्याचे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख ई. व्ही. राव यांच्या हस्ते याप्रसंगी विशेष तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. माझगाव गोदीत ३ नोव्हेंबर १९७८ रोजी या युद्धनौकेच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर १० डिसेंबर १९८३ रोजी सभारंभपूर्वक भारतीय नौदलात तिचा समावेश करण्यात आला. श्रीलंकेत १९८८ मध्ये झालेले नौदलाचे ऑपरेशन ज्युपिटर, सोमालियात भारतीय लष्कराच्या मदतीसाठी १९९४ मध्ये राबवलेले ऑपरेशन शिल्ड आणि ऑपरेशन बोल्स्टर आणि एडनच्या समुद्रात सोमालिया चाच्यांविरुद्ध राबवलेल्या धडक मोहिमांमध्ये या युद्धनौकेने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

Next >>