Whats new

रशिया बनविणार भारतात हेलिकॉप्टर्स

 INDIA-RUSIYA

‘मेक इन इंडिया‘अंतर्गत रशिया भारतात कामोव्ह 226 ही हेलिकॉप्टर तयार करण्याबाबतचा मोठा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात झाला आहे. या मोहिमेअंतर्गत झालेला हा आतापर्यंत सर्वांत मोठा संरक्षण करार आहे. तसेच, विविध क्षेत्रांशी निगडित सोळा करारांवरही या वेळी स्वाक्षरी झाली.

मोदी यांच्या रशिया दौऱ्यामध्ये अपेक्षेप्रमाणेच हा संरक्षण करार झाला आहे. यानुसार, भारत आणि रशिया हे संयुक्तरित्या हेलिकॉप्टर तयार करणार आहेत. करार झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी मोदी म्हणाले, ‘रशिया हा भारताचा सर्वांत विश्वासू मित्र आहे. दोन्ही देशांमधील अणुऊर्जा क्षेत्रांतील सहकार्य वाढत आहे. दोन प्रकल्पांमध्ये रशियाच्या बारा अणुभट्ट्यांबाबत बरीच प्रगती झाली आहे. तसेच, दोन्ही देशांमधील खासगी उद्योगांनाही सहकार्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आमचे चांगले संबंध हेच संरक्षण आणि राजनिती सहकार्याचा स्रोत आहे.‘‘ पुतीन हे भारत आणि रशियाच्या धोरणात्मक संबंधांचे शिल्पकार आहेत, अशी स्तुतीही मोदी यांनी केली. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यामध्ये रशियाचा मोठा सहभाग असेल, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांमधील संबंधांचे वर्णन करताना मोदी यांनी "हे संबंध हायड्रोकार्बनपासून हिऱ्यापर्यंत प्रगत झाले आहे,‘ असे वर्णन केले आहे. विमानावर इजिप्तमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतही पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले. दहशतवादाशी लढण्यासाठी सर्व जगाने एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भारताशी संबंध दृढ होत असल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी आनंद व्यक्त केला. पुढील वीस वर्षांमध्ये भारतात सहा नवी अणुऊर्जा केंद्रे उभारण्याचा विचार असल्याचे पुतीन यांनी सांगितले. अत्यंत समतोल आणि जबाबदार परराष्ट्र धोरण राबविणारे भारत हे शक्तिशाली राष्ट्र आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. यानंतर मोदी यांनी भारतीय समुदायासमोरही भाषण करून दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर भर दिला.

Next >>