Whats new

सय्यद किरमाणींना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार

 SYED KIRMANI

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांना प्रतिष्ठेचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुख्यालयात पुरस्कार निवड समितीची बैठक झाली आणि त्यात 65 वर्षीय किरमाणींच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. आकर्षक चषक, मानपत्र व 25 लाख रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सदर पुरस्कार निवड समितीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकुर आणि एन. राम यांचा समावेश राहिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे सध्या भारतीय संघाचे पहिले कसोटी कर्णधार कर्नल सी. के. नायडू यांची शताब्दी साजरी केली जात असून त्या पार्श्वभूमीवर नायडूंच्या नावे पुरस्कार दिला जाणार आहे. भारतीय क्रिकेटसाठी मैदानात व मैदानाबाहेर दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव करणे हा या पुरस्कार प्रदान करण्याचा मुख्य उद्देश आहे.

सय्यद किरमाणी यांनी 1976 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण नोंदवले. भारताच्या भेदक फिरकी गोलंदाजी लाईनअपसमोर त्यांनी यष्टीरक्षणाची धुरा समर्थपणे सांभाळली. शिवाय, ही परंपरा साधारणपणे दशकभर कायम राखली. फारुख इंजिनियर संघात असताना किरमाणींनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी यष्टीरक्षणाच्या आपल्या जबाबदारीला देखील पुरेपूर न्याय दिला होता. तळाच्या स्थानी उपयुक्त फलंदाजी, ही सुद्धा किरमाणी यांची खासियत राहिली. 1981-82 मध्ये इंग्लंडविरुद्ध सलग 3 कसोटी सामन्यात किरमाणी यांनी एकही बाय दिली नाही, हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्टय़ ठरले.

किरमाणी यांनी 1983 च्या विश्वचषकात कपिलला उत्तम साथ देत संघाला अडचणीतून बाहेर काढले. शिवाय, सुनील गावसकरनी वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद 236 धावांची खेळी साकारली, त्या लढतीत सनीसमवेत नवव्या गडय़ासाठी 143 धावांची भागीदारीही केली. किरमाणी यांना 1982 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्षपदही भूषवले. याशिवाय, राष्ट्रीय निवड समितीचे एकवेळ ते अध्यक्षही राहिले आहेत. किरमाणी यांनी 88 कसोटी सामन्यात 27.04 च्या सरासरीने 2759 धावा जमवल्या. शिवाय, यष्टीमागे 160 झेल व 38 यष्टीचीत बळीही नोंदवले. त्यांनी वनडेतही लक्षवेधी योगदान देताना 49 सामन्यात 20.72 च्या सरासरीने 373 धावा, 47 झेल व 9 यष्टीचीत अशी कामगिरी नोंदवली.

Next >>