Whats new

धनसंचयातही फेडरर, जोकोव्हिच विक्रमवीर

 fedrar-jeovitch

जेतेपदे आणि विक्रम या आघाडय़ांवर नवी शिखरे गाठणारे रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच नव्या वर्षांत धनसंचयातही अनोखा टप्पा गाठणार आहेत. विविध स्पर्धाच्या बक्षीस रकमेद्वारे तब्बल १० कोटी डॉलर्सची कमाई करण्याचा मान फेडरर आणि जोकोव्हिच पटकावणार आहेत. टेनिसच्या इतिहासात बक्षीस रकमेद्वारे एवढी रक्कम अद्याप कोणीही मिळवलेली नाही. नव्या वर्षांत या दोघांच्या रूपाने टेनिसविश्वात अनोखा पायंडा पडणार आहे.

२८ वर्षीय जोकोव्हिचच्या नावावर ९ कोटी ४० लाख डॉलर्स एवढी बक्षीस रक्कम जमा आहे. फेडररच्या खात्यावर ९ कोटी ७३ लाख डॉलर्स बक्षीस रक्कम म्हणून जमा आहे. नव्या वर्षांतील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेत्याला ३८ लाख ५० हजार डॉलर्स बक्षीस रक्कमेने गौरवण्यात येणार आहे. तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवत फेडररने या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यास केवळ बक्षीस रकमेद्वारे १० कोटी डॉलर्सची कमाई करणारा तो पहिला टेनिसपटू ठरू शकतो. १९६०च्या दशकात कॅलेंडर स्लॅमचा विक्रम नावावर करणारे महान टेनिसपटू रॉड लेव्हर यांची बक्षीस रक्कमेची एकूण मिळकत १५ लाख डॉलर्स एवढी होती. जॉन मॅकेन्रो यांच्या नावावर एक कोटी २५ लाख डॉलर्स तर पीट सॅम्प्रसकडे चार कोटी ३० लाख डॉलर्स जमा झाले. सरत्या वर्षांत जोकोव्हिचने २ कोटी १५ लाख डॉलर्स एवढी धनराशी जेतेपदांच्या माध्यमातून नावावर केली. यंदाचे वर्ष माझ्यासाठी संस्मरणीय ठरले. नव्या वर्षांतही हाच फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न असेल असे जोकोव्हिचने सांगितले.

टेनिसपटू बक्षीस रक्कमेद्वारे कमाई · रॉजर फेडरर ९ कोटी ७३ लाख डॉलर्स · नोव्हाक जोकोव्हिच ९ कोटी ४० लाख डॉलर्स · राफेल नदाल ७ कोटी ५० लाख डॉलर्स · अँडी मरे ४ कोटी २५ लाख डॉलर्स · सेरेना विल्यम्स ७ कोटी ४० लाख डॉलर्स · मारिया शारापोव्हा ३ कोटी ६४ लाख डॉलर्स

Next >>