Whats new

भारतीय फिरकीपटू आर. अश्विन आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी

ashwin

भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठून वर्षाचा शेवट गोड केला आहे. या अव्वल नंबरी कामगिरीसह अश्विनने क्रिकेट इतिहासात नवा इतिहासदेखील रचला आहे. वर्षाचा शेवट अव्वल मानांकनाने करणारा अश्विन हा दुसराच भारतीय फिरकीपटू ठरला आहे. त्याने तब्बल ४२ वर्षांनंतर ही किमया साधली आहे. याआधी १९७३ मध्ये फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.

द.आफ्रिकेविरुद्धच्या झंझावाती कामगिरीमुळे अश्विनला ही किमया साधता आली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. अश्विन त्याच्या चार गुणांनी पिछाडीवर होता. स्टेनने इंग्लंड दौ-यात पहिल्या डावात चार विकेट्सही घेतल्या होत्या. पण खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो दुस-या डावात पूर्णकाळ खेळू शकला नाही. दुस-या डावात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे स्टेन पिछाडीवर गेला आणि अश्विनने वर्षाच्या अखेरीस कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान काबीज केले.