Whats new

श्याम बेनेगल, सौमित्र चॅटर्जी यांना पिफ जीवनगौरव पुरस्कार

 BENEGAL

मंथन, भूमिका, निशांत, अंकुर अशा एकापेक्षा एक आशयघन चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे दिग्दर्शक श्‍याम बेनेगल आणि ज्येष्ठ अभिनेते व कवी सौमित्र चॅटर्जी यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच प्रयोगशील संगीतकार उत्तम सिंग यांना एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, अशी घोषणा महोत्सवाचे संचालक दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केली.

या तीन पुरस्कारांसह अनिमेशन क्षेत्रातील अजोड कामगिरीबद्दल राम मोहन यांना डीएसके पिफ लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड-2016 इन ऍनिमेशन या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे होणा-या लघुपट स्पर्धात्मक विभागामधील चित्रपटांचीही घोषणा या वेळी करण्यात आली.

स्पर्धेत सात मराठी चित्रपट

महोत्सवात दाखल झालेल्या मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत निवड करण्यात आलेल्या सात चित्रपटांच्या नावाची घोषणाही डॉ. जब्बार पटेल यांनी या वेळी केली. या वर्षी विभागाच्या अंतिम फेरीत नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित हाय वे, मकरंद माने यांचा रिंगण, शिवाजी लोटन पाटील यांचा हलाल, प्रसाद नामजोशी दिग्दर्शित रंगा पतंगा, महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट व आदिश केळुस्कर दिग्दर्शित कौल या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.