Whats new

बिनी बन्सल आता फ्लिपकार्ट कंपनीचे नवे सीईओ

 FLIPKART

देशातील आघाडीचा ऑनलाइन खरेदी-विक्री मंच फ्लिपकार्टने आपल्या व्यवस्थापनात बदल मोठे बदल केले आहेत. कंपनीचे सहसंस्थापक व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर बिनी बन्सल आता कंपनीचे नवे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. फ्लिपकार्टचे विद्यमान सीईओ सचिन बन्सल कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. बिनी बन्सल यांच्याकडे आता फ्लिपकार्टच्या आर्थिक, कायदेशीर, कॉर्पोरेट विकास व मानव संसाधन विभागांसह ई-कार्ट, एरिआज्-कॉमर्स व मिंत्रासारख्या उपकंपन्यांच्या कारभाराची जबाबदारी हस्तांतरित होणार आहे.

कार्यकारी अध्यक्ष म्हणून सचिन बन्सल हे कंपनीच्या व्यवसायाची धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी वरिष्ठ टीमला मार्गदर्शन करतील. तसेच कंपनीमध्ये नवनवी गुंतवणूक आणण्यावर त्यांचा भर असणार आहे. मुकेश बन्सल हे वाणिज्य व जाहिरात विभागाचे प्रमुख पद कायम आहे. ते फ्लिपकार्टची सहाय्यक कंपनी मिंत्राचे अध्यक्ष आहेत.

सध्या फ्लिपकार्टने ई-कॉमर्स बाजारपेठेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 5 कोटींवर पोचली असून 60 टक्के उत्पन्न एम-कॉमर्स म्हणजेच मोबाईलवरील खरेदी-विक्रीतून मिळत आहे. नव्या आकडेवारीनुसार, फ्लिपकार्टच्या वेबसाईटला दिवसाला एक कोटी ग्राहक भेट देतात. गेल्यावर्षी कंपनीच्या ऑनलाईन मंचावरून मोबाईल फोन्स, फूटवेअर, साड्या, घड्याळे व पॉवर बँक या उत्पादनांची सर्वाधिक विक्री झाली आहे.