Whats new

गुजरातमध्ये प्रजासत्ताकदिनी ‘बेटी को सलाम, देश के नाम’ उपक्रम

 flag

प्रजासत्ताक दिनी ‘बेटी को सलाम, देश के नाम’ हा अनोखा उपक्रम गुजरात सरकारने आखला आहे. या निर्णयानुसार प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गावामध्ये तेथील सर्वाधिक शिकलेल्या मुलीच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. सर्वच शासकीय शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण अधिका-यांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

गुजरात सरकारने मुलींना बहुमान देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्याचे ठरवले आहे. याबाबतचे आदेशही सरकारने सर्व शाळांना पाठवले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिका-यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. शासकीय शाळांबरोबरच खासगी शाळांमध्येही हा उपक्रम राबवला जावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच 2016 मध्ये जन्मलेल्या मुलींच्या पालकांचाही खास गौरव केला जाणार आहे. यासाठी सरकारकडून मदतही केली जाणार आहे. मुलींचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘बेटी को सलाम, देश के नाम’ हे अभियान या प्रजासत्ताक दिनी राबवले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.