Whats new

चंद्रपूर येथे राज्यातील दुसरी सैनिकी शाळा

 SAINIK

चंद्रपूर येथे राज्यातील दुसरी सैनिक शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार येत्या १५ दिवसांत राज्य सरकारसोबत केला जाईल आणि आगामी दोन वर्षांत ही सैनिक शाळा सुरू करण्यात येईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले आहे. यासंबंधी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर चंद्रपूर सैनिक शाळेसाठी १२३ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगितले. ६०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली ही शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी सांगितले.

इको बटालियनवर चर्चा
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात झाडांची संख्या अत्यल्प आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड करून ती जगवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाद्वारे इको बटालियन नियुक्त करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

मुंबईत सैनिक स्मारक
देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणा-या भारतीय सैन्यातील वीरांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा प्रकारचे देशातील हे पहिले स्मारक असून, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य संरक्षण मंत्रालयाकडून दिले जाईल, असे पर्रीकर यांनी सांगितले.