Whats new

विदेशी कंपनीने बनवला 'मेक इन इंडिया'चा लोगो

 MAKE IN INDIA

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'मेक इन इंडिया' या उपक्रमाचा लोगो (बोधचिन्ह) एका विदेशी कंपनीने भारतातील शाखेत तयार केल्याची माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील चंद्र शेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे.

बोधचिन्ह तयार करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया केलेली नाही. 2014-15 मध्ये क्रिएटिव्ह एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निविदा मागवल्या होत्या. त्या आधारे विडेन+केनेडी इंडिया लि. या कंपनीची निवड करण्यात आली आणि त्या कंपनीनेच 'मेक इन इंडिया'चे बोधचिन्ह तयार केले, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.

'मेक इन इंडिया'च्या प्रचार, प्रसिद्धीचे काम विडेन+केनेडी या कंपनीकडे देण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीला 11 कोटी रुपये देण्यात येणार आहेत, असेही उत्तरात म्हटले आहे. 'मेक इन इंडिया'चा उपक्रम चांगला आहे. मात्र, जर भारतीय कंपनीकडून बोधचिन्ह तयार केले असते, तर अधिक प्रभावी संदेश पोचला असता. भारतामध्ये कल्पक प्रतिभेची (क्रिएटिव्ह टॅलेंट) कमी नाही, अशा प्रतिक्रिया गौर यांनी व्यक्त केली आहे. स्वतंत्र जाहिरात एजन्सी म्हणून विडेन+केनेडी ही कंपनी काम करते. ती मूळ अमेरिकेतील पोर्टलंडमधील कंपनी आहे. बीजिंग, लंडन, न्युयॉर्क, शांघाय, टोकयो आणि भारतासह अन्य काही ठिकाणी कंपनीच्या शाखा आहेत.