Whats new

नाशकातील धामणीच्या वाघ दाम्पत्याला राष्ट्रपती भवनातून निमंत्रण

 WAGH

नाशिक जिल्ह्यातल्या धामणी गावच्या वाघ दाम्पत्याला यंदा प्रजासत्ताक दिनाचे विशेष निमंत्रित म्हणून थेट राष्ट्रपती भवनातून बोलवणं आलं आहे. त्यामुळे संपूर्ण धामणी गाव भारावून गेलं आहे. धामणी सहसा कुणाच्याही खिजगणतीत नसलेलं नाशिक जिल्ह्यातलं एक दुर्गम गाव. मात्र, सध्या बड्या अधिका-यांपासून ते पत्रकारापर्यंत, सर्वांनीच या गावाची वाट धरली आहे. मात्र, रातोरात धामणी गाव प्रकाशझोतात येण्याचं कारण वाघ दाम्पत्याचं कर्तृत्व. मासेमारी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणारे बाळू वाघ आणि त्यांच्या पत्नी संगीता. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला विशेष पाहुणे म्हणून वाघ यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. घरात अठराविश्वं दारिद्र्य. मात्र, पोटाला चिमटा काढून बाळू वाघ यांनी स्वतःच्या मुलांना तर शिकवलं. मात्र, गावातही ज्ञानाजर्नाचा दिवा पेटवला. सरकारनं वाघ दाम्पत्यास विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करून, त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.

जेव्हापासून राष्ट्रपतींचं आमंत्रण आलंय, तेव्हापासून वाघ दाम्पत्य धामणी गावातले सेलिब्रेटी झाले आहेत. सकाळ-संध्याकाळ गावक-यांचा वाघ यांच्या घराबाहेर राबता सुरू आहे. ज्या गावात कधी खासदार फिरकला नव्हता, त्या धामणी गावाची आज दिल्लीलाही दखल घ्यावी लागली आहे.