Whats new

आईने केले ब्रेनडेड मुलाचे अवयवदान; मुंबई, चेन्नईला किडनी, लिव्हर, हृदय पाठवणार

 HUMAN BODY

बी.एस्सी झालेला तरुण नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला म्हणून अकोल्याला गेला, निवडही झाली, पण परतताना क्रूर नियतीने घाला घातला आणि भीषण अपघात होऊन ब्रेनडेड झाला. बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव महीच्या २४ वर्षीय रामची ही दुर्दैवी कहाणी. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या स्थितीतही रामच्या आई मंदाबाई यांनी मन घट्ट करून त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. सिग्मा रुग्णालयात शस्त्रक्रिया करून रामचे अवयव काढले जातील आणि तत्काळ विमानाने मुंबई व चेन्नईला पाठवले जातील. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

पती सुधाकर यांच्या निधनानंतर मंदाबाई यांनी दोन मुले व दोन मुलींचा २० वर्षांपासून सांभाळ केला. थोरला श्याम बारावीनंतर घरची १८ एकर शेती करू लागला. धाकटा राम कृषी पदवीधर झाला. अकोल्याहून परतणा-या रामची दुचाकी मेहकर-मालेगाव रस्त्यावरील गतिरोधकावर आदळली. यात त्याच्या मेंदूला जबर मार लागला. योगायोगाने रामचे चुलतभाऊ मागाहून येत होते. रामला आधी मेहकर येथे व नंतर औरंगाबादच्या एमआयटी रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. रामचे काका सुभाष राजाराम मगर, मामा सिद्धेश्वर गाडगे यांनी त्याच्या अवयवदानाचा विचार मांडला. मंदाबाई यांनी कोणाला जीवदान मिळणार असेल तर हरकत नाही, असा निर्णय १५ मिनिटांत दिला. मग रामला सिग्मा रुग्णालयात हलवण्यात आले.

कुणाला काय मिळणार
जसलोक रुग्णालय, मुंबई : किडनी
धूत रुग्णालय औरंगाबाद : किडनी
ग्लोबल रुग्णालय मुंबई : लिव्हर
चेन्नई : हृदय