Whats new

नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेस ‘आयएसओ’

 ISO

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘आयएसओ’ मानांकन मिळवण्यात पहिला नंबर पटकावण्याचा मान सावतानगर केंद्राने मिळवला आहे. शाळेच्या आवारात प्रवेश करताच जाई, जुई, कण्हेरीची झाडे मन प्रसन्न करतात. मराठी माध्यम असलेली पहिली ते चौथी या वर्गाची ही द्विशिक्षकी शाळा आहे. शाळेच्या व्हरांड्यातील बोधवाक्ये बुद्धीला चालना देतात. या शाळेचा शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातून सतत तीन वर्षांपासून प्रथम क्रमांक येत आहे. शाळेची १०० टक्के पटनोंदणी असते. याचे श्रेय येथील शिक्षकांना जाते. ग्रामस्थांना एकत्र करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आपल्याला एका विशिष्ट उंचीला ही शाळा पोहोचवायची असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असे पालक-शिक्षक मेळाव्यात ठरवण्यात आले. त्यानुसार, शालेय कामकाज व अध्यापनाचे नियोजन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून शिक्षणाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, समस्या लक्षात घेतल्या जाऊ लागल्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. त्यानुसार एका आदर्श शाळेकडे वाटचाल सुरू झाली. शाळेसाठी ग्रामस्थांनी बाक, तारेचे कुंपण, पोषण आहारासाठी भांडे, महापुरुषांचे फोटो, तसेच संगणक लेखन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळेमध्ये मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम घेतले जातात. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेची प्रतिज्ञाही घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी शालेय व वैयक्तीक स्वच्छतेचे स्वयंशिस्तीने पालन करतात. मुलांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने पहिलीपासून मराठीसह इंग्रजी लेखन, वाचन यांचा सराव केला जातो. मुलांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून बाल वाचनालय अभ्यासिका येथे चालवली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देत विशेष नैपुण्य दाखवणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही गौरव केला जातो. असे अनेक उपक्रम राबवून ही शाळा एक उपक्रमशील व समृद्ध शाळा झाली आहे. येथील शिक्षिका विद्या पाटील यांना जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वाच्या मेहनतीने शाळेची गुणवत्ता व दर्जा वाढत आहे. मुख्याध्यापक हेमंत पवार यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाटी शाळेत विविध शालेय उपक्रम राबवले जात असल्याची माहिती दिली. सुनीता मोकळ यांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून, शाळेतील प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग असल्याचे नमूद केले.