Whats new

भारत-मालदीवमध्ये आरोग्य क्षेत्रातील करार

 India-Maldiv

भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळाने आरोग्य क्षेत्रातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर भविष्यात शेजारील राष्ट्रांना मदतीचा हात देताना आरोग्य क्षेत्रातील मानवी संसाधनामध्ये सहकार्य करण्यालाही अनुकूलता दर्शवली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. त्यानुसार आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधांसोबत डॉक्टरांचे प्रशिक्षण, अन्य आरोग्यतज्ज्ञांचे सहकार्य, औषधे आणि आरोग्याशी निगडित संशोधनाचे आदान-प्रदान केले जाणार आहे. जानेवारी २०१४ मध्ये भारत आणि मालदीव यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला अंतिम मान्यता दिली गेली. या वेळी केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून दोन्ही देशांनी आरोग्य क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचे मान्य केल्याचे नमूद केले आहे. या सामंजस्य करारात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टराचे प्रशिक्षण, सेवेचे आदान-प्रदान, अधिकारी, अन्य आरोग्यतज्ज्ञ, मानवी संसाधन क्षेत्रातील सहकार्य आणि आरोग्य सेवेसोबत औषध व संशोधन या क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. त्याचबरोबर या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मानवी आरोग्य आणि सेवाक्षेत्रातही सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय जैविक व सर्वसाधारण औषधांच्या स्रोताबरोबरच औषधांची देवाण-घेवाण, आरोग्य सुधारणा, पारंपरिक व पूरक औषधे, टेलिमेडिसिन आणि अन्य क्षेत्रातील सहकार्याबाबत एकमेकांच्या संमतीने सहकार्य केले जाणार आहे. या सामंजस्य करारामुळे खऱ्या अर्थाने दोन देशांमधील संबधांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून मालदीवच्या आरोग्य संसाधन आणि सुविधा क्षेत्राताला उपयुक्त ठरणार आहे, तर आरोग्य क्षेत्रातील या सहकार्यामुळे दोन देशांमधील मैत्री आणि संबंध अधिक दृढ होणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.