Whats new

पाच वर्षांनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत अग्रस्थानी

 icc

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत अग्रस्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 7 गड्यांनी पराभूत व्हावे लागले. चार सामन्यांच्या मालिकेत कूक आणि कंपनी 2-0 ने आघाडीवर आहे. याचाच फटका द. आफ्रिकेला बसला असून त्यांची तिस-या स्थानी घसरण झाली आहे.

भारत सध्या 110 गुणांसह अव्वलस्थानी असून, ऑस्ट्रेलिया 109 गुणांसह दुस-या तर दक्षिण आफ्रिका 107 गुणांसह तिस-या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकन संघाची अपयशी मालिका सुरू असून, गत नऊ कसोटींपैकी त्यांनी पाच पराभव, तर चार सामने अनिर्णीत अवस्थेत संपवले आहेत. इंग्लंडविरुद्ध कसोटीआधी त्यांचे 114 गुण होते. पण, सलग दोन पराभवांमुळे त्यांचे आता 107 गुण झाले आहेत.

भारताने गतवर्षी श्रीलंकेविरुद्ध 3-0 असा मालिकाविजय संपादन करत दुस-या स्थानी झेप घेतली होती. यापूर्वी 2009 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अग्रस्थान प्राप्त केले होते. दोन वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी राहिल्यानंतर 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे भारताने पहिले स्थानही गमावले होते. आता पाच वर्षांनंतर भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारी - भारत (110 गुण), ऑस्ट्रेलिया (109), दक्षिण आफ्रिका (107), पाकिस्तान (106), इंग्लंड (104), न्यूझीलंड (100), श्रीलंका (89), वेस्ट इंडिज (76), बांगलादेश (47), झिम्बाब्वे (5 गुण).