Whats new

मुंबई मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातील मुलींनी मिळवले पहिले तीन क्रमांक

 Maharashtra

लाखो डॉलरचे इनाम मिळणारी स्पर्धा म्हणून मुंबई मॅरेथॉनमध्ये परदेशातील दिग्गज मॅरेथॉनपटू सहभागी होत असतात आणि वर्चस्वही गाजवत असतात. स्पर्धेच्या प्रारंभापासून असलेले हे चित्र आता बदलू लागले आहे. एलिट गटात केनिया आणि इथिओपिया धावपटूंचा दबदबा मोडून काढणे कठीण आहे; पण इतर गटांत भारतीय एथलिट ठसा उमटवत आहेत. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये तर महाराष्ट्राच्या धावपटूंनी मोठी भरारी घेऊन आपली ताकद दाखवली. २१ किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये मोनिका राऊत (नागपूर), मनीषा साळुंखे (सांगली-पुणे) आणि मोनिका आथरे (नाशिक) या महाराष्ट्राच्या महिलांनी पहिले तीन क्रमांक मिळवले; तर पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या दीपक बापू कुंभारने सुवर्णपदक जिंकले. भारतीय विभागात महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सध्या कल्याणमध्ये राहणा-या सुधा सिंगने पहिले स्थान मिळवले. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. याच गटात दुसरे स्थान साता-याच्या ललिता बाबरने मिळवले.

ललिता, जैशाची अखेरची मॅरेथॉन गेल्या वर्षी भारतीय विभागात विजेती ठरलेली ललिता बाबर आणि दोन वर्षांपूर्वी पहिली आलेली आणि यंदा तिसरा क्रमांक मिळवणारी ओपी जैशा यांनी या यशानंतर मॅरेथॉनला बायबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाचे वर्ष मॅरेथॉनचे आहे. मुंबई मॅरेथॉनमधील या यशामुळे त्या ऑलिंपिकमधील मॅरेथॉनसाठी पात्र ठरल्या असल्या, तरी त्या अनुक्रमे स्टीपल चेस आणि १५०० व ५००० मीटरमध्ये धावणार आहेत.

असे आहेत महाराष्ट्राचे वीर
अर्धमॅरेथॉन महिला - १) मोनिका राऊत (१.१७.२० मि.), २) मनीषा साळुंखे (१.१९.१७), ३) मोनिका आथरे (१.२०.०८).
पुरुष - १) दीपकबापू कुंभार (१.०६.०१).
पूर्ण मॅरेथॉन (भारत) - १) सुधा सिंग (२.३९.२८), २) ललिता बाबर (२.४१.५५).