Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

गौरव सहस्रबुद्धेला मरणोत्तर भारत पुरस्कार; नीलेश, मोहित, वैभव यांचाही सन्मान

 BHARAT

संकटसमयी अतुलनीय धैर्याचा परिचय देत शौर्य गाजवणा-या बालवीरांनी महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. देशभरातून गौरवण्यात येणा-या २५ बालवीरांच्यामध्ये महाराष्ट्राच्या चार शूर बालकांचा समावेश आहे. बुडणा-या मित्रांना वाचवताना प्राण गमवावे लागलेल्या नागपूरच्या गौरव सहस्रबुद्धे याला सर्वोच्च ‘भारत पुरस्कार’ मरणोत्तर जाहीर झाला आहे, तर नीलेश भिल (जि. जळगाव), वैभव घंगारे (जि. वर्धा) आणि मोहित दळवी (मुंबई) यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जाईल.

भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. यात तीन मुली आणि २२ मुले यांना पुरस्कार जाहीर झाला असून, प्रथेप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या शूर बालकांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार मिळवणा-या बालकांना शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे आर्थिक मदत केली जाणार आहे.

नागपूरच्या गौरव सहस्रबुद्धे याने ३ जून २०१४ ला अंबाझरी तलावात बुडणा-या आपल्या चार मित्रांचे प्राण वाचवले होते. तलावाजवळ खेळताना मित्र पाण्यात बुडत असल्याचे कळताच गौरवने जिवाची पर्वा न करता तिघांना सुखरूप बाहेर काढले. चौथ्या मित्रालाही वाचवले, मात्र त्यात त्याला आपले प्राण गमवावे लागले. या साहसी कर्तृत्वाबद्दल त्याला शौर्य पुरस्कारांमधील सर्वोच्च ‘भारत पुरस्कार’ मरणोत्तर दिला जाणारा आहे. गौरवची आई रेखा सहस्त्रबुद्धे या पुरस्कार स्वीकारतील.

पाचवीचा विद्यार्थी असलेल्या नीलेश रेवाराम भिल (रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याने २० ऑगस्ट २०१४ ला संत मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी उगले कुटुंबीयांचा ११ वर्षांचा मुलगा मंदिरासमोरच्या घाटावर पाय धुण्यासाठी गेला असताना पाण्यात पडला. दर्शनासाठी आलेल्या नीलेशने प्रसंगावधान राखून पाण्यात उडी घेत त्या मुलाला वाचवले, तर सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे (जि. वर्धा) वैभव रामेश्वर घंगारे याने २६ जुलै २०१४ ला नदीच्या पुरात वाहून जाणा-या मित्राचे प्राण वाचवले. पुलाखालील सिमेंटच्या पाइपाजवळ अडकलेल्या या मुलाच्या मदतीला धावून जाण्यास कोणीही धजावले नसताना वैभवने हे धाडस दाखवले.

मुंबईतील वाळकेश्वर भागातील २५ फूट खोल तलावात बुडणा-या मुलीला वाचवून मोहित दळवीने सर्वांची वाहवा मिळवली. आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे आत्याकडे राहणारा मोहित महापालिकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेचा आठवीचा विद्यार्थी आहे. मामाकडे दिवाळीच्या सुटीत आलेली मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली असता बुडत होती. अशा वेळी मोहितने धावून जात २५ फूट खोल तलावात उडी घेतली तिचे प्राण वाचवले व जवळच्या रुग्णालयात भरती केले.