Whats new

आता दुकाने सुरू राहणार ३६५ दिवस आणि तेही रात्री ११ वाजेपर्यंत

 SHOPKEEPER

दुकाने पहाटे ५ पासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची तरतूद असलेल्या किरकोळ आस्थापना धोरणास राज्य मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली. याशिवाय, साप्ताहिक सुटीविना दुकाने ३६५ दिवस सुरू ठेवता येणार आहेत. या धोरणात आणखी काही सुधारणा करून त्यास मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता दिली जाणार आहे. मात्र, नोकरांना नियमित स्वरूपात साप्ताहिक सुटी द्यावी लागेल.

या धोरणानुसार, किरकोळ दुकानदारांना अत्यावश्यक वस्तू कायद्यातील साठ्याच्या मर्यादेतून वगळण्यात येणार आहे. शेतक-यांना माल थेट किरकोळ व्यापा-यांना विकता येऊ शकेल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माध्यम वापरण्याची सक्ती नसेल. किरकोळ व्यापा-यांना त्यामुळे बाजार समितीस सेस द्यावा लागणार नाही. या धोरणामुळे किरकोळ व्यापा-यांना आणि शेतक-यांना मोठा फायदा होईल आणि विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.

किरकोळ दुकानांसाठी एकूण क्षेत्रफळाच्या ७० टक्के जागेवर बांधकाम करता येईल. मात्र, मंजूर एफएसआयचे पालन करणे आणि आग आदी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या लागतील. पार्किंगसाठी अतिरिक्त जागा मिळेल. मजल्यांची उंची ५.५ मीटरपर्यंत वाढवता येईल. मंजूर एफएसआयच्या अतिरिक्त ५० टक्के एफएसआय शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी वापरता येईल; पण त्यासाठी अतिरिक्त प्रीमियम द्यावा लागेल.