Whats new

सात राज्यांमध्ये बनणार प्लास्टिक पार्क

 plastic

प्लास्टिक उद्योगामध्ये स्टार्टअपची संधी देण्यासाठी सात राज्यांमध्ये प्लास्टिक पार्क तयार करण्यात येत आहेत. यामधील गुजरातमध्ये तर पार्कची उभारणीही करण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये प्लास्टिक पार्क तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्यप्रदेशमध्ये प्लास्टिक पार्क चालू वर्षात तयार करण्यात येणार आहे, तर अन्य दोन राज्यांमध्ये दोन वर्षांत पार्क पूर्ण करण्यात येणार आहेत.

गुजरातच्या दाहेजमध्ये प्लास्टिक पार्क तयार झाले आहे, तर उत्तर प्रदेशच्या औरेयामध्ये पार्क तयार करण्याचे काम सुरू आहे. मध्यप्रदेशच्या टामोटमध्ये जुलैपर्यंत पार्कची निर्मित्ती पूर्ण करण्यात येणार आहे. ओडिशातील पारादीप, कर्नाटकमधील बेंगळूरमध्ये, राजस्थानमधील उडवारिया आणि आसाममधील तिनसुकीया येथे या पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे.

काय आहे प्लास्टिक पार्क
प्लास्टिक पार्क म्हणजे ज्या ठिकाणी प्लास्टिक उद्योगांची स्थापना करण्यात येईल. या पार्कमध्ये उद्योग क्षेत्र, सामान्य सुविधा केंद्र, साधन खोली, कौशल्य विकास केंद्र, ट्रक टर्मिनल्स, पार्किंग, गेस्ट हाऊससह अनेक सुविधा असणार आहेत. या पार्कमध्ये प्लास्टिक वस्तू तयार करण्याबरोबरच प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्पही असेल. त्यामुळे प्लास्टिक कच-याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

स्टार्टअपला होणार फायदा
या पार्कची निर्मिती करण्यामध्ये ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची महत्त्वाची भूमिका आहे. प्लास्टिक उद्योगांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना असून, येत्या काळात ती पूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्कमध्ये उद्योगांसोबत तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास आणि इनक्युबेशन केंद्र असणार आहे. स्टार्टअपसाठी याचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष आर. के. अग्रवाल यांनी म्हटले आहे.