Whats new

महिनाभर पाच ग्रह एकाच रेषेत पाहण्याची खगोल निरीक्षकांना अनोखी संधी

 star

ज्यांना आकाश निरीक्षणाचा छंद आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या सूर्यमालेतील पाच ग्रह सध्या एकाच रेषेत दिसत आहेत, ते तीन आठवडे तरी या अवस्थेत राहणार असून पहाटेपूर्वी त्यांचे दर्शन घेता येईल. अशी घटना यापूर्वी अकरा वर्षांपूर्वी 2005 मध्ये घडली होती. बुध, शुक्र, मंगळ, गुरू व शनी हे ग्रह आकाशात अंडाकार कक्षेत दिसतील, इतरवेळी फार थोडे ग्रह आकाशात एकाचवेळी दिसतात. सध्या पाच ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला आहेत, त्याचा अर्थ ते रात्री एकावेळी दिसतात हे उघड आहे, असे दिल्लीच्या नेहरू तारांगणाच्या संचालिका एन. रत्नाश्री यांनी सांगितले.

२० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान हे ग्रह सकाळी एका रेषेत दिसणार आहेत, पण सूर्योदयाच्या वेळा विचारात घेतल्या तर २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान पाच ग्रह एका रेषेत दिसतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे ग्रह चांगल्या

पद्धतीने दिसू शकतील, असे स्पेस या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक सदस्य सी.बी.देवगण यांनी सांगितले. बुध हा सर्वात लहान ग्रह असून तो सूर्याच्या जवळ आहे, त्यामुळे तो दिल्लीत क्षितिजाच्या अगदी जवळ टेकलेला दिसेल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बुध क्षितिजापासून जरा वर आलेला दिसेल. सकाळी सहा वाजेच्या सुमारास किंवा सूर्योदयाच्या एक तास अगोदर हे ग्रह चांगले दर्शन देतील असे देवगण यांनी स्पष्ट केले. अशी घटना यापूर्वी १५ डिसेंबर २००४ ते १५ जानेवारी २००५ दरम्यान घडली होती. अशीच अवस्था यापुढे यावर्षांतच ऑगस्ट महिन्यात असणार आहे, पण त्या वेळी हे ग्रह सायंकाळी एकाचवेळी आकाशात दिसतील, त्यामुळे तेव्हा ते बघण्यासाठी जास्त काळ मिळू शकेल. आकाशात पूर्वेकडे बघा काही ग्रह पहाटेपूर्वीच आकाशात उगवतात व मावळतात कारण त्यांचा मार्ग चंद्र व सूर्यासारखाच असतो. गुरू आधी उगवतो, मग मंगळ मध्यरात्री तर नंतर शनी, शुक्र व बुध हे ग्रह उगवतात. हे ग्रह पाहण्यासाठी आकाशात पूर्वेकडे बघा व नंतर किंचित दक्षिणकडे बघा. सर्व ग्रह येथे उगवतात व नंतर आकाशात एका रेषेत दिसतात, नंतर ते पश्चिम क्षितिजाच्या उत्तरेकडे दिसतात. शुक्र नेहमीप्रमाणे चमकदार दिसणार आहे, त्यानंतर गुरू व मंगळ क्रमाने प्रकाशमान दिसतील, मंगळ लालसर रंगाचा दिसेल.