Whats new

पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची सुधारित यादी प्रकाशित

BIRD

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये २९ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची सुधारित यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत ११ नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. बीएनएचएसच्या पक्षी व जैवविविधता क्षेत्र उपक्रमांतर्गत प्रकल्प अधिकारी डॉ. राजू कसंबे यांनी ही यादी संकलित केली आहे. वाइल्ड कोकण व निसर्गप्रेमी मंडळ, सावंतवाडी यांनी २९ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र, चिपळूण हे संमेलनाचे समन्वयक आहेत. संमेलनाचे यजमानपद सावंतवाडी नगरपरिषदेकडे आहे. संमेलनाची संकल्पना ‘पक्षी आणि पर्यटन’ आहे. महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात पक्षी तसेच अन्य वन्यजीवांची विविधता आढळते. नैसर्गिक विविधतेतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक विविधतेमुळे प्रत्येक भाषेत पशु-पक्ष्यांची निरनिराळी सुंदर नावे रूढ झाली आहेत. कोकणापासून विदर्भापर्यंत संपूर्ण राज्यातील अभ्यासक, निरीक्षक व निसर्गप्रेमींचा गोंधळ होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे सर्व प्रजातींची शास्त्रीय नावे जगभरात एकच ठरवलेली आहेत, त्याप्रमाणे मराठीत सर्व पक्ष्यांना एक प्रमाण नाव असावे, या उद्देशाने ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यापूर्वी संकलित केलेल्या यादीत महाराष्ट्रात अलीकडे झालेल्या पक्ष्यांच्या नोंदींची भर पडल्याने आता सुधारित यादीत एकूण ५७७ प्रजातींच्या नावांचा समावेश आहे. .