Whats new

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माने पाचवे स्थान पटकावले

ROHIT

नुकताच झालेल्या आस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तुफान फलंदाजी केलेल्या रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले. विशेष म्हणजे त्याने ८ स्थानांची जबरदस्त झेप घेताना पाचवे स्थान मिळवले असून, हे त्याचे सर्वोत्तम मानांकन आहे. या मालिकेत मालिकावीर ठरलेल्या रोहितने ५ सामन्यांतून ४४१ धावा फटकावल्या असून, यामध्ये दोन शतके आणि अखेरच्या सामन्यातील ९९ धावांच्या शानदार खेळीचा समावेश आहे. विराट कोहलीनंतर आयसीसी रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थान असलेला रोहित दुसरा भारतीय ठरला आहे. कोहली सध्या जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असून, निराशाजनक कामगिरीच्या गर्तेत सापडलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीची १३ व्या स्थानी घसरण झाली आहे.मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबईकर रोहितने ५९ गुण मिळवले असून, तो कोहलीहून ६४ गुणांनी पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलियर्स अव्वल स्थानी कायम असून, कोहली त्याच्याहून ७५ गुणांनी मागे आहे. त्याचवेळी अव्वल दहामध्ये समावेश असलेला शिखर धवन तिसरा भारतीय असून तो सातव्या क्रमांकावर कायम आहे. गोलंदाजीत घसरण भारताचा आफस्पिनर रविचंद्रन आश्विन दोन स्थानांनी ११ व्या स्थानी घसरला आहे, तर भुवनेश्वर कुमार ७ स्थानांनी २० व्या स्थानी आला आहे. अक्षर पटेल आणि उमेश यादव यांचीदेखील अनुक्रमे ४४ व्या व ४१ व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी आस्ट्रेलियाकडून जेम्स फॉल्कनरच्या क्रमवारीत ७ स्थानांनी घसरण झाली असून, तो २८ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे अव्वल ५० गोलंदाजांमध्ये केवळ भारताच्या रवींद्र जडेजाची प्रगती झाली असून, तो दोन स्थानांनी २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. .