Whats new

भारतातील सर्वात वयोवृद्ध मतदार असलेल्या श्याम शरण नेगीचे ९८ व्या वर्षीही मतदान

shyam negi

 

भारतातील सर्वात वयोवृद्ध मतदार असलेल्या ९८ वर्षांच्या श्याम शरण नेगी यांनी हिमाचल प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत मतदान करून १९५१ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदान करण्याचा आपला विक्रम कायम राखला.

हिमाचल प्रदेशात पहिल्या टप्प्यात ७३२ पंचायतींसाठी मतदान झाले. त्यात कुन्नूर या दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यातील काल्पी गावातील मतदान केंद्रावर नेगी यांनी मतदान केले. शंभरीच्या उंबरठ्यावरील वय आणि प्रकृतीच्या तक्रारी यांची तमा न बाळगता नेगी यांनी मतदानासाठी त्यांच्या घरापासून एक किमीपेक्षा जास्त प्रवास केला. नेगी यांनी मतदानाला येता येईल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली होती. परंतु नेगी यांचे मतदान चुकू नये याकडे खास लक्ष देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार खास वाहनाची व्यवस्था करून नेगी यांना घरून मतदानासाठी आणण्यात आले. मतदान केल्यावर त्यांचा सत्कारही केला गेला.

मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग गेली काही वर्षे विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेगी यांना ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर’ही नेमले होते.जरा कीही खुट्ट झाले की टीव्ही कॅमेऱ्यांकडे नजर ठेवत हाती मेणबत्त्या घेऊन प्रमुख शहरांच्या चौकांमध्ये जमणारे पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी घराबाहेरही न पडणारे ‘सिव्हिल सोसायटी’चे तथाकथित धुरिण आणि एखाद्या पवित्र कर्तव्याप्रमाणे नेमाने मतदान करणारे नेगी यांच्यातील विरोधाभास लक्षणीय आहे.