Whats new

भारताकडे सातव्यांदा सॅफ चषक

SAFF championships

 

भारताने गतविजेत्या अफगाणिस्तानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून सॅफ चषक फुटबॉल स्पर्धेचे सातव्यांदा जेतेपद पटकावत मागील वेळी झालेल्या पराभवाची परतफेडही केली. सुनील चेत्रीने जादा वेळेत विजयी गोल नोंदवला.

2013 मध्ये नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या स्पर्धेत भारताला अफगाणकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड करण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरलेल्या भारताने प्रारंभापासूनच वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केली. मात्र पहिले यश पाहुण्या संघाला मिळाले. पूर्वार्ध कोरा गेल्यानंतर उत्तरार्धात 69 व्या मिनिटाला झुबेर अमिरीने गोल नेंदवून अफगाणला आघाडीवर नेले. पण तीनच मिनिटानंतर जेजे लालपेखलुआने भारताला बरोबरी साधून दिली. उर्वरित वेळेत दोन्ही संघांना गोल नोंदवता न आल्याने जादा वेळ देण्यात आला. जादा वेळेतील दहाव्या मिनिटाला भारतीय कर्णधार सुनील चेत्रीने शानदार गोल नोंदवून भारताला पुन्हा एकदा जेतेपद मिळवून दिले. सलग तिस-यांदा या स्पर्धेच्या अंतिम लढतीत याच दोन संघांची गाठ पडली आहे. भारताने यापूर्वी 2011 मध्ये जेतेपद मिळविले होते.

कॉन्स्टन्टाईन यांच्या मार्गदर्शनाखालील भारताला याहून मोठय़ा फरकाने विजय मिळविता आला असता. पण सदोष नेमबाजीमुळे भारताचे दोन गोल हुकले. फिफाच्या क्रमवारीत अफगाण (150) भारतापेक्षा (166) वरच्या क्रमांकावर असून दुस-यांदा सूत्रे स्वीकारल्यानंतर कॉन्स्टन्टाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने मिळविलेले हे पहिलेच आंतरराष्ट्रीय जेतेपद आहे. या जेतेपदामुळे त्यांच्यावरील दडपण थोडेसे कमी होणार आहे. कारण अलीकडेच झालेल्या 2018 च्या विश्वचषक पात्रता फेरीत भारताने पाच सामने गमविले तर फक्त एक सामना जिंकण्याची कामगिरी केली.या स्पर्धेची ही 11 वी आवृत्ती असून त्यापैकी दहावेळा भारताने अंतिम फेरी गाठली आहे. या जेतेपदाने दक्षिण आशियाई विभागात भारताने आपले वर्चस्व पुन्हा एका स्थापित केले आहे. याशिवाय फिफाच्या नव्या मानांकनातही भारताची प्रगती होणार आहे. अफगाण संघातील 20 पैकी 15 खेळाडू विदेशात स्थायिक झालेले आहेत. शेवटची सॅफ स्पर्धा जिंकून जाण्याच्या इराद्यानेच ते भारतात आले होते. पण अखेरीस त्यांची निराशा झाल्याने उपविजेतेपदावरच त्यांना समाधान मानावे लागले. यापुढे ते सॅफऐवजी अलीकडेच निर्माण झालेल्या सेंट्रल आशियाई फेडरेशनच्या  स्पर्धेत भाग घेणार आहेत.उपांत्य फेरीत मालदिवला 3-2 असे हरविणारा संघच भारताने या सामन्यातही कायम ठेवला तर लंकेवर 5-0 असा दणदणीत विजय मिळविलेल्या अफगाणने आपल्या संघात दोन बदल केले होते. सुरुवातीच्या काही मिनिटांत अफगाणने बॉल पझेशनच्या बाबतीत थोडेसे वर्चस्व गाजविले. पण स्थिरावल्यानंतर भारताने सामन्यावर नियंत्रण मिळविले आणि हळूहळू वर्चस्व गाजविले.