Whats new

उ. कोरियात हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी, चाचणीनंतर परिसरात भूकंपाचे धक्के

 korea

 

उत्तर कोरियाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणीचा दावा केला आहे. या चाचणीनंतर काही वेळातच परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. मात्र, हा भूकंप नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचा आरोप जपान आणि दक्षिण कोरियाने केला आहे. उत्तर कोरियातील अणुबॉम्ब चाचणी केंद्राजवळ बसलेला भूकंपाचा धक्का अणुबॉम्ब चाचणीमुळेच झाल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.

अणुबॉम्बपेक्षा हायड्रोजन बॉम्ब विध्वंस क्षमता कितीतरी पटीनं जास्त असते. त्याची निर्मितीदेखील अवघड असते. उत्तर कोरियाचा हा पहिला हायड्रोजन बॉम्ब आहे. पण तज्ज्ञांच्या मते, सध्या उ. कोरियाकडे अल्पविकसित अणुबॉम्ब आहेत. दहा वर्षांपासून उ. कोरिया अणुबॉम्बची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग युन यांनी आपल्या देशानं हायड्रोजन बॉम्ब तयार केल्याचे संकेत दिले होते. अण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने उत्तर कोरियाने टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचं मानलं जात आहे. तर दक्षिण कोरिया, जपानसह अन्य या देशांनी या चाचणीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, उत्तर कोरियानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचं उल्लंघन केल्याची टीका केली आहे.