Whats new

मराठी साहित्याला राजाश्रय देणार राज्य सरकार

 marathi

 

मराठी साहित्याचा प्रसार व विक्रीसाठी कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महापालिकेचे गाळे अल्प भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मराठी साहित्याला या स्मार्ट निर्णयामुळे राजाश्रय मिळणार असून, शासनाने मराठी साहित्यप्रेमींना नवीन वर्षाची भेट दिली आहे.

राज्याचा ऐतिहासिक वारसा, संस्कृती जतन करण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. मराठी साहित्याचा प्रसार व विक्री करण्यासाठी महापालिकेचे गाळे उपलब्ध केल्यास त्याचा चांगला फायदा होईल, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यातील ५०० व एक हजार चौरस फूट आकारमानाचा गाळा अल्प भाड्याने मराठी साहित्य विक्रीसाठी दिला जाणार आहे. ज्यांना साहित्य वाचायचे आहे, त्यांना ते स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले पाहिजे, या हेतूने शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महापालिकांनी आपल्या क्षेत्रात जे गाळे बांधले आहेत, त्यातील ५०० व एक हजार चौरस फूट आकाराचा गाळा अल्प भाड्याने मराठी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. केवळ महापालिकाच नव्हे तर नगरपालिका स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशाही सूचना शासनाने दिल्या आहेत.