Whats new

दिल्ली डायनामोसच्या व्यवस्थापकपदी रॉबर्टो कार्लोस

RABORTO CARLOS  

ब्राझिलचा हुकमी फुटबॉलपटू रॉबर्टो कार्लोस बरोबर दुसऱ्या इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेसाठी दिल्ली डायनामोस संघाने नवा करार केला आहे. जागतिक फुटबॉल क्षेत्रात रॉबर्टो कार्लोस फ्री किक स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. दिल्ली डायनामोस संघाच्या फ्रेन्चायजीने रॉबर्टो कार्लोसची खेळाडू आणि संघ व्यवस्थापक म्हणून घोषणा करून सर्वाना अनपेक्षित धक्का दिला आहे.

दिल्ली डायनामोसने यावर्षी रॉबर्टो कार्लोस समवेत 3.5 कोटी रूपयांचा करार केला आहे. या संघाने कार्लोसवर दुहेरी जबाबदारी टाकून आपला बराच पैसा वाचविला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंशी करार करण्याकरिता प्रत्येक क्लबला 15.5 कोटी रूपये मिळतात.

दिल्ली डायनामोसचा संघ फ्रान्सचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच चेल्सी क्लबकडून खेळणाऱ्या 35 वर्षीय मेलोडाशी लवकरच करार करणार असल्याचे संकेत आहेत. दिल्ली डायनामोसच्या फ्रेन्चायजीने दुसऱ्या इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेसाठी हेन्स मुल्डेर आणि गस्टेव्ह डॉस सॅन्टोस यांच्या बरोबरचा करार कायम ठेवला आहे. दिल्ली डायनामोस संघाच्या सामन्यांना पहिल्या इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत प्रेक्षकांचा प्रतिसाद समाधानकारक लाभला नव्हता. त्यामुळे यावेळी हा संघ रॉबर्टो कार्लोसच्या नावाचा तिकीट-जर्सी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करणार असल्याचे समजते.