Whats new

देशातील आठ पक्षी प्रजाती धोक्यात

birds

पक्ष्यांच्या अधिवासाचा विनाश आणि अशाश्वत विकास याचा दुष्परिणाम पक्ष्यांच्या प्रजातीवर झाला असून, नव्याने ८ पक्षीप्रजाती धोक्यात आल्या आहेत. पक्षीसंवर्धन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्थेने (आययुसीएन) २०१५ ची लाल यादी जाहीर केली असून, जगभरातील १८० पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात आहेत. गेल्या वर्षी १७३ पक्ष्यांच्या प्रजातींचा लाल यादीत समावेश होता.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), बर्डलाईफ इंटरनॅशनल (अमेरिका आधारित) आणि इतर सहभागी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून धोक्यात आलेल्या पक्षी प्रजातींमध्ये गवताळ आणि पाणथळ प्रदेशातील पक्ष्यांचा समावेश आहे. ८ पक्ष्यांच्या प्रजातींपैकी ५ प्रजाती लाल यादीतील ‘कमी धोकादायक’ गटात आहेत. यात ‘नॉर्दन लॅप्विंग’ हा गवताळ प्रदेशातील पक्षी आणि ‘रेड नॉट’, ‘क्युर्ले सँडपायपर’, ‘युरोशियन ऑस्टेरकॅचर’ आणि ‘बार टेल्ड गॉडवीट’ या पाणथळ प्रदेशातील पक्ष्यांचा समावेश आहे. ‘हॉर्न ग्रेब’ आणि ‘कॉमन पोचार्ड’ या दोन पाणथळ पक्ष्यांच्या प्रजाती संकटग्रस्ट, तर ‘स्टेप इगल’ हा भारतीय उपखंडातील पक्षीही संकटग्रस्त गटात आहेत. ८ पक्ष्यांच्या प्रजाती आययुसीएनच्या लाल यादीत आल्यामुळे पक्षीजगतात नैराश्य असले तरीही ‘युरोपियन रोलर’ हा लाल यादीतील धोकादायक गटातील पक्षी त्यातून बाहेर पडल्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, २०१४ मध्ये आययुसीएनने जाहीर केलेल्या लाल यादीतही ८ पक्ष्यांच्या प्रजातींचा लाल यादीत समावेश होता. यात ‘वुली नेक्ड स्टॉर्क’, ‘अंदमान टील’, ‘अंदमान ग्रीन पीजन’, ‘अॅशीहेडेड ग्रीन पीजन’, ‘रेड हेडेड फाल्कन’, ‘हिमालयीन ग्रीफान’, ‘बिअर्डेड वल्चर’ आणि ‘युन्नाह नुथाट्च’ या पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश होता. गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश, जंगल यासारखा पक्ष्यांचा अधिवास अशाश्वत विकासात्मक उपक्रमांमुळे धोक्यात आला असल्याचा निष्कर्ष आययुसीएनने नोंदवला आहे. आफ्रिकेतील ११ गिधाडांसह इतर प्रजातींमध्ये ‘अटलांटिक पुफिन’, ‘युरोपीयन टर्टल-डव्ह’ आणि ‘हेल्मेटेड हॉर्नबिल’ यांचा समावेश आहे. मात्र, त्याचवेळी २३ पक्षी प्रजाती कमी धोकादायक गटातून बाहेर पडल्याने पक्षी अभ्यासक याकडे सकारात्मक बाब म्हणून पहात आहेत.