Whats new

चीनच्या तुलनेत भारतात कमी भ्रष्टाचार

trnsparency

जगभराच्या 175 देशांमध्ये भ्रष्टाचार नियंत्रणांचे मानांकन जारी करणारी संस्था ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने (टीआय) चीनच्या तुलनेत भारतात भ्रष्टाचार कमी असल्याचे म्हटले आहे. जर्मनीस्थित टीआयने आपल्या मानांकन यादीत भारताला 85 वे स्थान तर चीनला 100 वे स्थान दिले आहे. भारताने पहिल्यांदाच या यादीत चीनला मागे टाकले आहे.
100 पर्यंतच्या मानांकनात भारताने 38 पॉइंट मिळविले आहेत. तर चीनने 36 पॉइंट प्राप्त केले आहेत. कोणत्याही देशाने आदर्श पॉइंट प्राप्त केले नसल्याचे टीआयने सांगितले. मानांकन पद्धतीत 0 (सर्वाधिक भ्रष्ट) पासून 100 (एकदम स्वच्छ प्रतिमा) च्या पॉइंटदरम्यान दोन तृतीयाशंपेक्षा अधिक देशांनीच 50 पेक्षा अधिक पॉइंट मिळविले आहेत. परंतु तज्ञांच्या मते भारत आणि चीनमध्ये 15 स्थानांचा हा फरक अधिक नाही. हे भ्रष्टाचार नियंत्रण मानांकन 2014 साठी जारी करण्यात आले आहे.
चीनला मागे टाकले -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या सभेत या मानांकनाचा उल्लेख केला. आपल्या कार्यकाळात भारतातून भ्रष्टाचार दूर होत असल्याचे त्यांनी म्हटले. भ्रष्टाचार नियंत्रण प्रकरणी भारताने चीनला मागे टाकल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या मानांकनात डेन्मार्कने 92 पॉइंट मिळवत सर्वात कमी भ्रष्ट देशाचा मान मिळविला आहे. तर सर्वात भ्रष्ट देश आफ्रिकी देश सोमालिया आणि उत्तर कोरिया ठरले आहेत. त्यांना फक्त 8 पॉइंट मिळविता आले.
कसे होते मानांकन -
तज्ञांच्या मतांच्या आधारावर जगात सार्वजनिक क्षेत्रात फैलावलेल्या भ्रष्टाचाराची पातळी तपासली जाते. यानंतर या देशांचे मानांकन निश्चित केले जाते असे टीआयचे म्हणणे आहे. या मानांकनाद्वारे भ्रष्टाचाराबाबत संबंधित देशांना इशारा देण्याचे एकप्रकारे काम केले जाते. या मानांकनाचा वापर जागतिक गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यासाठी होतो.