Whats new

म्यानमारमध्ये लोकशाहीची सोनपावले..

aung-san

म्यानमारमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले असून सुरुवातीला जाहीर झालेल्या १६ पैकी १५ जागा आंग सान स्यू की यांच्या दी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या लोकशाहीवादी पक्षाला मिळाल्या आहेत. सुरुवातीच्या संकेतांनुसार एनएलडीला बहुमत मिळण्याची शक्यता असली तरी देशात लोकशाहीची पहाट होईल की नाही हे आताच सांगणे धाडसाचे ठरेल असे तज्ज्ञांचे मत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले, की प्राथमिक आकडेवारी ४८ तासांत जाहीर होईल, पण संपूर्ण आकडेवारी दहा दिवसांत कळेल.

यांगून हा लोकशाहीवाद्यांचा बालेकिल्ला असून तेथे कनिष्ठ सभागृहाच्या १२ तर प्रादेशिक तीन जागा त्यांना मिळाल्या आहेत. चौथी जागा लष्करवादी यूएसडीपीला मिळाली आहे. एनएलडीच्या समर्थकांनी रस्त्यांवर जल्लोष केला. एनएलडी या पक्षाने विजयाची जाहीर घोषणा केलेली नाही. स्यू की यांना अजूनही लष्करी राज्यघटनेनुसार अध्यक्षपदाची परवानगी नाही. त्यामुळे त्यांचा सावध पवित्रा आहे. स्यू की यांनी पक्षाच्या यांगून येथील मुख्यालयाच्या बाल्कनीत येऊन सांगितले, की विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्याची ही वेळ नाही. लोक काही बोलले नसले तरी त्यांना निकाल माहिती होता.

गेली पन्नासहून अधिक वर्षे तेथे लष्कराची सत्ता होती. म्यानमारमधील राज्यघटनेनुसार २५ टक्के जागा लष्कराला द्याव्याच लागतात, त्यामुळे सत्ताधारी लष्करी आघाडीचे महत्त्व कमी होणार नाही. लष्कराचा पाठिंबा असलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पक्षाचे अनेक दिग्गज हरले आहेत. ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार या सरकार समर्थित पक्षाने लोकशाहीची पहाट होत असल्याचे मान्य केले आहे. यूएसडीपीचे उमेदवार शावे मान यांनी एनएलडीकडून पराभव झाल्याचे मान्य केले आहे.