Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

युनूस खान वनडेमधून तडकाफडकी निवृत्त

Younis-Khan

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनूस खानने इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यानंतरच वनडे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एका पत्रकातून त्याने माध्यमांना आपल्या निवृत्तीची माहिती दिली. 15 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्ती स्वीकारणे खूप कठीण होते, आपण केव्हा निवृत्त व्हायचे, त्याचा निर्णय आपल्यालाच घेता आला, हे सुदैव, अशी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथील विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तान निवडकर्त्यांनी युनूसला संघातून जवळपास बाहेर टाकले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याला अचानक संघात पाचारण करण्यात आले. 37 वर्षीय युनूसचा हा 265 वा सामना होता. त्यानंतर त्याने वनडे क्रिकेटला अलविदा केला. फेब्रुवारी 2000 मध्ये कराची येथे श्रीलंकेविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले होते.
शेवटच्या सामन्यापूर्वी युनूसने 7240 धावा जमवल्या तर यात 7 शतके व 48 अर्धशतकांचा समावेश राहिला. मार्च 2013 नंतर मात्र त्याला केवळ 11 वनडे सामन्यातच संधी देण्यात आली. यामुळे, त्याच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ‘माझ्या कुटुंबियांशी, सहका-यांशी, मित्र परिवाराशी चर्चेनंतरच मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही क्रिकेट प्रकारातून निवृत्त होणे इतके सोपे नव्हते. ‘देशात प्रचंड गुणवत्ता आहे आणि युवा खेळाडू देखील तडफेनेच खेळतील व शिस्तपालन, तंदुरुस्ती यावर पूर्ण भर देतील’, असे युनूस याप्रसंगी पुढे म्हणाला. यापूर्वी, युनूस इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेली मालिका पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होईल, अशी अपेक्षा होती. मुळात इंग्लंडविरुद्ध आता संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी युनूस पात्र आहे का, यावर चर्चा झडत असल्याने त्यामुळे युनूस मालिकेनंतर निवृत्तीचा निर्णय घेईल, असेही अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, त्यापूर्वीच युनूसने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.
युनूस मागील काही वर्षात विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये अधिक बहरात राहिला असून 9 हजार कसोटी धावांचा टप्पा सर करणारा तो पहिलाच पाक फलंदाजही ठरला आहे. या वाटचालीत त्याने कसोटीत 31 शतके झळकावली. वनडे क्रिकेटमध्ये मात्र त्याला बरेच झगडावे लागले. 264 सामन्यात त्याला केवळ 31.34 च्या सरासरीवर समाधान मानावे लागले. कसोटी क्रिकेटमध्ये युनूसने 104 सामन्यात 53.94 अशी सरासरी नोंदवली. 2009 मध्ये इंग्लंड येथे त्याने पाकिस्तानला टी-20 विश्वचषकाचे एकमेव जेतेपद प्राप्त करुन दिले. मात्र, त्यानंतर लगेच त्याने या छोटय़ा क्रिकेट प्रकारातून निवृत्तीही जाहीर केली होती.