Whats new

भारत-ब्रिटनची नागरी अणुकरारावर स्वाक्षरी

india-uk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये पाऊल ठेवत ब्रिटनसोबतच्या नव्या सहकार्य पर्वाचा प्रारंभ केला आहे. संरक्षण, व्यापार आणि काही क्षेत्रांत ९ अब्ज पौंडांच्या गुंतवणुकीसह नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करीत दोन देशांनी संबंध भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करीत विविध करारांची घोषणा केली.
नागरी अणुकरारावर स्वाक्षरी केली असून, ही परस्परांविषयीच्या विश्वासाचे चिन्ह आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही असलेले देश आपल्या संबंधांची खरी ताकद ओळखू शकले नव्हते. दोन्ही देश द्विपक्षीय शिखर परिषदांमधील सातत्य वाढविणार असून तंत्रज्ञान, संस्कृती, विज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्याची नवीनवी दालने उघडतील. सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला ब्रिटन समर्थन देत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही कॅमेरून यांनी केली. प्रश्नोत्तराच्या सत्रात मोदींना भारतातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांबद्दल पत्रकारांनी छेडले असता मोदींनी भारतातील प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. भारत ही बुद्धाची भूमी आहे. आम्ही बेकायदेशीर बाबींना मुळीच थारा देत नाही. प्रत्येक घटनेची दखल घेत कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.