Whats new

देशात ६० टक्के मधुमेही ‘फॅटी लिव्हर’ने त्रस्त

diabeties

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा आजार जगभरातील लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. भारतात तर एक कोटीहून अधिक लोकांना मधुमेहाने ग्रासले असून हा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. या आजारावर वेळेत नियंत्रण न मिळवल्यास मूत्रपिंड विकार, अर्धागवायू, अंधत्व आदी विविध दीर्घकालीन व्याधी होण्याची शक्यता असते.
पण यात सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे यकृतातील मेद. (फॅटी लिव्हर) मधुमेहाची लागण झालेल्यांनी आहाराची काळजी न घेतल्यास त्यांना यकृताचा त्रास होण्याची शक्यता असते. भारतात मधुमेहींच्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्णांत यकृतातील मेदाचे प्रमाण वाढले आहे.
‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त मधुमेह रुग्णांमध्ये विविध आजारांसंदर्भात जनजागृतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतात दरवर्षी २ लाख लोक यकृत निकामी झाल्याने मृत्यू पावतात. केवळ मद्यपानामुळे यकृत खराब होत नाहीतर तर जीवनशैलीशी निगडित आजार, अनुवंशिकता यामुळेही यकृतातील मेदाचे प्रमाण वाढते.
विशेषत: मधुमेहाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम यकृतावर होतो. शरीरातील वाढत्या चरबीमुळे रुग्णाला ‘लिव्हर सिरोसिस’ची शक्यता अधिक असते. यकृत हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी यकृताची काळजी घेणे गरजेचे आहे.
‘लिव्हर सिरोसिस’ झाल्यास यकृताची प्रक्रिया बिघडते. हा आजार हळूहळू वाढू लागतो. सुरुवातीला या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. जसजसा हा आजार वाढत जातो तसतसा रुग्णांना थकवा, पायाला सूज येणे, चीडचीड वाढणे, त्वचा पिवळी पडणे, पोटात पाण्याची मात्रा वाढणे व शरीरातील पेशी कमी होणे अशा व्याधी जाणवू लागतात. तसेच अन्ननलिका किंवा हातापायाच्या नसांमधून रक्तस्राव होण्याची शक्यताही असते. मधुमेही रुग्णांत या आजाराची फारशी लक्षणे दिसून येत नसल्याने रुग्णांना हे कळत नाही व हा आजार झाल्याचे लक्षात येते तोवर खूप उशीर झालेला असतो. परंतु, हेपेटायटीस ‘बी’ करता उपलब्ध लस आणि हेपेटायटीस ‘बी’ व ‘सी’ करता केले जाणारे औषधोपचारांसाठी यकृत निकामी होण्याच्या घटना कमी होत असल्या तरी यकृतात मेदाचे प्रमाण वाढून कर्करोग होण्याची शक्यता असते. यात वेळेवर उपचार न मिळाल्याने यकृताचा कर्करोग होऊन रुग्ण दगावतो, असेही डॉ. घाडगे यांनी सांगितले.
लहान मुलांना ‘टाईप-२’ मधुमेहाचा धोका- मागील दहा वर्षात मधुमेही रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. पूर्वी केवळ ३०-३५ वयोगटांतील व्यक्तींना मधुमेहाचा त्रास व्हायचा. परंतु, आता पिझ्झा, बर्गर अशा विविध पदार्थाच्या अतिसेवनामुळे १२ वर्षाच्या लहान मुलांनाही मधुमेहाने ग्रासल्याचे पाहायला मिळते. सध्या लहान मुलांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मैदानी खेळ, व्यायाम व आहार याकडे मुले दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांचे वजन वाढत जाते. ‘टाईप-२’ मधुमेहाची शक्यता अधिक असते. अतिस्थूल असलेल्या जवळपास ९५ टक्के व्यक्तींना टाईप-२ प्रकारची लक्षणे आढळून आली आहेत. तसेच मोठय़ा व्यक्तींमध्ये टाईप-२ मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येते. त्यांची सुरुवात लहानपणापासूनच होते. आहारावर योग्य लक्ष दिल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते, असे मधुमेहतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मधुमेहाची लागण झालेले २५ टक्के रुग्ण मानसिक ताणतणावाखाली वावरणारे आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण या आजारामुळे मानसिकदृष्टय़ा खचत चालले आहेत. यासंदर्भात उपचारासाठी विशिष्ट थेरपी उपलब्ध आहे. परंतु, त्यांना होणारा त्रास हा मधुमेहामुळे असल्याने रुग्ण या थेरपीसाठी तयार होत नाही.