Whats new

लंडनमधील मादाम तुसाँची लवकरच दिल्लीमध्येही शाखा

madame

जगातील प्रसिद्ध आणि ख्यातकीर्त व्यक्तींचे मेणाचे पुतळे साकारणाऱ्या लंडनस्थित मादाम तुसाँ या संग्रहालयाची एक शाखा लवकरच दिल्लीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांचे मेणाचे पुतळे या संग्रहालयात ठेवण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंड दौऱ्यावर असतानाच ही घोषणा करण्यात आली. भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये २०१७ हे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात आतापर्यंत महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, कतरिना कैफ यांच्यासह इतर काही प्रसिद्ध कलावंतांचे मेणाचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सांगितले की, भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आर्थिक क्षेत्राच्या पुढे गेले आहेत. दोन्ही देशांकडून जगभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि संपन्न वारशाची निर्यात झाली आहे. आता हाच क्षण दोघांनी मिळून एकत्रितपणे साजरा करण्याची वेळ आली आहे.
या उपक्रमांतर्गतच शेक्सपिअरच्या हस्तलिखिताची प्रतिकृती भारतात सुरू होणाऱ्या संग्रहालायत काही दिवसांसाठी ठेवण्यात येईल. १७१४ ते १९१४ या काळात भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात झालेले लिखाण जगातील वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी दक्षिण आशियातील दोन लाख पाने डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २०१७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. इंग्लंड आणि भारत दोन्ही ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत, असेही कॅमेरून यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये संग्रहालय बांधण्यासाठी ब्रिटनच्या सर्वोच्च संस्थांचा सहभाग असणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांतील सांस्कृतिक देवाण घेवाणीसह ब्रिटिश कलाकुसरीचा नमुनाही भारतासह सर्व जगाला पाहता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.