Whats new

नाशिकला जगातील सर्वाधिक उंच ऋषभदेव

NASHIK-RUSHBHDEV

आधी कळस मग पाया, या क्रमाने बांधकाम झालेल्या वेरुळच्या ऐतिहासिक लेण्या जगभरातील अभ्यासक, पर्यटकांचे आकर्षण अन्‌ संशोधनाचा विषय आहे. मात्र, त्यानंतरचे दुसरे ऋषभदेवांचे जैन शिल्प नाशिकला मांगीतुंगी या जैन देवस्थानाच्या डोंगरावर साकारत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातून साकारणारी जगातील सर्वाधिक उंचीची मूर्ती आहे. त्यामुळे जगभर सिंहस्थ, श्रीराम अन्‌ विविध पौराणिक इतिहासासाठी वैश्‍विक ख्याती असलेले नाशिक जगभरातील जैनांच्या धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी ख्यातकीर्त ठरणार आहे. येत्या 11 ते 17 फेब्रुवारीदरम्यान पंतप्रधानांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महामस्तकाभिषेकाद्वारे त्याचे लोकार्पण होईल.
मांगीतुंगी हे देशभरातील जैन धर्मीयांसाठी पवित्र स्थळ गणले जाते. नवी दिल्ली (हस्तिनापूर) येथील ज्ञानमती माताजी येथे 1993 मध्ये चातुर्मासासाठी आल्यावर त्यांनी 108 फूट उंचीच्या जैन मूर्तीचा संकल्प सोडला होता. त्यानंतर डॉ. पन्नालाल पापडीवाल, (कै.) आमदार जयचंद कासलीवाल, तसेच प्रतिनिधिंनी या कामात वाहून घेऊन त्याचा पाठपुरावा केला. हा डोंगर वन विभागाच्या ताब्यात असल्याने त्याच्या परवानगीसाठी दीर्घ पाठपुरावा केल्यावर 1999 मध्ये त्याला परवानगी मिळाली. त्यानंतर हे काम सुरू झाले. त्यासाठी सांगलीचे अभियंता आर. सी. पाटील यांनी त्याचा आराखडा तयार केला. अनेक ज्ञात, अज्ञात संस्था व जैन बांधवांनी त्यात आपले आर्थिक व परिश्रमाचे योगदान दिल्याने त्याला सुरवात झाली.
गेली वीस वर्षे पाठपुरावा केल्यावर त्याचे अनेक टप्पे झाले. त्यासाठी पूर्व सर्वेक्षणात 121 फूट अखंड शीळा शोधण्याचे अवघड काम करण्यात आले होते. प्रत्यक्ष डोंगर कापताना प्रदूषण व पर्यावरणासह प्राणी, पक्ष्यांना हानी पोचू नये यासाठी डोंगरात छिद्र करून त्यात विशिष्ट प्रकारची चिनी माती टाकण्यात येते. त्यानंतर पाण्याचा वापर करून वायरने डोंगर कापण्यात आला. त्याने कोणतेही ध्वनिप्रदूषण न होता हे काम पूर्ण होऊ शकले. गेली अनेक वर्षे दीडशे ते दोनशे कारागीर व शिल्पकार हे काम करीत आहे.श्रवण बेळगोळ येथील 57 फूट बाहुबलींच्या प्रतिमेनंतर जैन धर्मीयांची भगवान ऋषभदेवांची साकारलेली 108 फूट उंचीची मूर्ती ही जगातील सर्वांत उंच मूर्ती असेल. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र जगाच्या नकाशावर येणार आहे. हे अद्वितीय काम असून, त्याचे साक्षीदार व स्थान नाशिकचे मांगीतुंगी होत आहे.