Whats new

बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच होणार : मुख्यमंत्री

BAL TAKRE

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महापौर बंगल्याला कोणताही धक्का न लावता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी एका विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात येणर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यानंतर महापौर बंगल्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यंमत्र्यांनी बाळासाहेबांच्या प्रस्तावित स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली.
स्मारकाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने स्मारकासाठी मुंबईतील परळ, दादर, नायगाव, वडाळा, महापौर बंगल्यासह अन्य काही जागांची पाहणी केली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी निश्चित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगतिले.
स्मारकाची रूपरेषा ठरविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एका विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात येईल. या समितीत राज्याच्या मुख्य सचिवांसह अन्य विभागाच्या सचिवांचा समावेश असेल, तसेच समितीच्या सदस्यांचा निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात बाळासाहेबांनी केलेले कार्य स्मारकाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि स्मारक समिती करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.